चिपळूण : भा. क. ल. वालावलकर रुग्णालय चिपळूण येथे कान नाक घसा विभागातर्फे कॅन्सरचा संशय असलेल्या थायरॉईड गाठीची दुर्मिळ शस्त्रक्रिया 15 मार्च रोजी करण्यात आली.
संबंधित महिला रुग्णास थायरॉईड गाठीचा त्रास एक वर्षांपासून होता. एक वर्षापूर्वी सुरुवातीला ती गाठ लहान होती आणि हळूहळू वाढत गेली. थायरॉईडच्या या गाठीमुळे रुग्णाला गिळताना त्रास होणे, दम लागणे, केस गळणे, वजन कमी होणे तसेच कॉस्मेटिक प्रॉब्लेम हे सर्व त्रास होत होते. त्यासाठी रुग्णाने अनेक ठिकाणी दाखवले पण फार फरक पडला नाही. शेवटी या महिलेने वालावलकर हॉस्पिटलमधील कान नाक घसा विभागातील डॉ. राजीव केणी व डॉ. प्रतीक शहाणे यांना दाखवले. त्यांनी तिची प्राथमिक तपासणी केली व सोनोग्राफी व सुईचा तपास करण्याचा सल्ला दिला.
सोनोग्राफी व सुईच्या तपासाच्या रिपोर्टनुसार थायरॉईडची गाठ ही कॅन्सरची गाठ असण्याची जास्त शक्यता वाटत असल्या कारणाने डॉक्टरने तिला लगेच ऑपरेट करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्णाचे ऑपरेशन 15 मार्च रोजी डॉ. राजीव केणी व डॉ. प्रतीक शहाणे यांनी यशस्वीरित्या केले. काढलेली थायरॉईडची गाठ पुढील तपासणीसाठी म्हणजेच कॅन्सरचे निदान करण्यासाठी पाठवली.
अशा ऑपरेशनमध्ये पेशंटचा आवाज जाणे, तसेच रक्तस्त्राव जास्त होऊन पेशंटची तब्येत ढासळणे असे त्रास होऊ शकतात. परंतु या केसमध्ये तसे काहीच झाले नाही. डॉक्टरनी आपली कुशलतापणा लावून शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण केली. या शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे तसेच वालावलकर हॉस्पिटल व्यवस्थापनाचे आभार मानले. या अवघड शस्त्रक्रियेला डॉ. लीना, डॉ. संदीप राव डॉ. शिवानी, डॉ. यथार्थ या भूलतज्ञांनी सहकार्य केलं











