नेताजी शिशुविहारच्या चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 

 

सावंतवाडी (प्रतिनिधी) :    मातृभूमी शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहारचे स्नेहसंमेलन चिमुकल्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने मोठ्या उत्साहात पार पडले. आगळीवेगळी बालवाडी म्हणून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख असलेल्या या शिशुविहारचा  वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला.

 

सावंतवाडी संस्थानच्या युवराणी श्रद्धाराजे सावंत भोसले यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन झाले. दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा स्टेजवरचा उत्साह व वावर प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करणारा होता. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सोनल लेले यांनी राजमाता सत्वशीलादेवी यांच्या उदार सहकार्याच्या आठवणी जागृत केल्या. संस्थेचे सचिव गणेश ठाकूर म्हणाले, मुलं ही मातीचा गोळा असतात. आकार द्यावा तशी मूर्ती  घडते. सुंदर मूर्तीसाठी आधी कसदार माती तयार करावी लागते. बालवाडी आधी सुंदर माती घडवण्याचे काम करत आहे असे स्पष्ट केले. मातृभूमी शिक्षण संस्थेची विस्तारणारी कार्ये त्यांनी सांगितली. संस्थेतर्फे स्वरसाधना संगीत विद्यालय तसेच शिवसंस्कार या उपक्रमाची व्याप्ती आंतरराज्य स्तरावर वाढत आहे. देशा बाहेरूनही अनेक शिवभक्त शिवसंस्कार उपक्रमाला जोडले गेले असल्याचे सांगितले.

 

यावेळी व्यासपीठावर पालक शिक्षक समिती अध्यक्ष कृष्णा करमळकर, श्रीमती कोळंबेकर उपस्थित होते. यावेळी श्रद्धाराजे यांच्या हस्ते पालकांचा सन्मान करण्यात आला. मुलांची मोरया मोरया, उंदीर मामा, भलगरी नृत्य, शिवाजीराजे पाळणा, रोहिडेश्वर शपथ व माता पालकांच्या नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शिशु विहारच्या उर्मिला राणे, प्रांजल टिळवे, प्रतिभा गवळी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन अस्मिता कोळी यांनी केले. कार्यक्रमात हार्मोनियमवर पल्लवी पिळणकर तर जस्मित पिळणकर यांनी तबला साथसांगत केली.