रिक्षा व्यावसायिक रोहिदास उर्फ बाबा राणे यांचा असाही प्रामाणिकपणा

सोन्याचे मंगळसूत्र असलेली छोटी पर्स केली पोलिसांकडे जमा

संतोष कोत्रे l लांजा – आजकाल माणसातील प्रामाणिकपणा लोप पावत चालत असल्याची उदाहरणे आपल्याला जागोजागी दिसून येतात .मात्र याला अपवाद ठरले आहेत ते लांजा येथील रिक्षा व्यवसायिक रोहिदास उर्फ बाबा राणे. स्टॅन्ड परिसरात सापडलेले मंगळसूत्र असलेली छोटी पर्स त्यांनी प्रामाणिकपणे लांजा पोलिस ठाण्यात जमा करून आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे.

सध्याच्या २१ व्या शतकात माणसातील प्रामाणिकपणा लोप पावत चालत असल्याचे आपल्याला अनेक उदाहरणातून दिसून येते. मात्र लांजा येथे रिक्षा व्यवसाय करणारे रोहिदास उर्फ बाबा राणे हे त्याला अपवाद ठरले आहेत. त्यांना गुरुवारी ४ एप्रिल रोजी सायंकाळी लांजा स्टॅन्ड परिसरात रिक्षा स्टॅन्ड जवळ त्यांना सोन्याचे एक सिंगल सर असलेले मंगळसूत्र असलेली छोटी पर्स सापडली होती. दुसरी एखादी कोणी व्यक्ती असते तर रस्त्यात सापडलेले हे मंगळसूत्र किंवा सोन्याचे दागिने त्याने आपल्याकडेच ठेवले असते. मात्र अंगभूत प्रामाणिकपणा असलेल्या रिक्षा व्यावसायिक रोहिदास राणे यांनी हे सोन्याचे मंगळसूत्र असलेली पर्स प्रामाणिकपणे लांजा पोलिसांच्या ताब्यात दिली. लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी त्यांचा छोटेखानी सत्कार करून त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

दरम्यान ज्या कोणाचे हे मंगळसूत्र हरवले असेल त्यांनी लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क करून ओळख पटवून घेऊन जावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांनी केले आहे.