तालुक्यातील इसवली रेवटेवाडी येथील घटना
लांजा (प्रतिनिधी) दारूच्या नशेत ३५ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील इसवली रेवटेवाडी येथे बुधवार दिनांक १० एप्रिल रोजी रात्री १ वाजता घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची खबर नितीन दत्ताराम साळवी (वय ५९ राहणार इसवली रेवटेवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे .त्यांचा मुलगा गिरीराज नितीन साळवी (वय ३५) दारूच्या आहारी गेला होता. दिनांक ९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता. त्यानंतर त्याने दारूच्या नशेत घरातील माणसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर न जेवतास तो रात्री १२.३० वाजण्याच्या दरम्याने कपड्यांना इस्त्री करण्यासाठी किचन रूम मध्ये गेला. तिथून तो कोणालाही काही न सांगता घरातून पाठीमागच्या दरवाज्याने बाहेर गेला आणि घराच्या पाठीमागील दरवाज्याला कडी लावून पाठीमागे आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
इस्त्री करण्यासाठी गेलेल्या गिरीराजचा. आवाज न आल्याने घरच्यांनी किचनमध्ये जावून पाहिले असता तो न दिसल्याने व मागील दरवाजारा बाहेरून कडी लावल्याचे लक्षात आल्यावर कुटूंबिय घराच्या पाठीमागे गेले असता तो आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र त्याची हालचाल असल्याने तातडीने घरच्यांनी गिरीराज याला लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल टी. एस.मोरे करत आहेत.












