तुमच्या कुटुंबातील हक्काच्या माणसाला दिल्लीत पाठवा
महायुतीच्या आरोंदा येथील मेळाव्याला उदंड प्रतिसाद
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचं व माझं नातं हे भावनिक नातं आहे. हा जिल्हा माझं घर असून येथील माणसं हे माझे कुटुंब आहे. त्यामुळे या कुटुंबातील प्रत्येक सदस्य सुखी व समृद्ध व्हावा यासाठी गेली ३५ वर्षे मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. तुम्ही देखील मला नेहमीच भरभरून दिले आहे. आता तुमच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी मला अधिक काम करायचे असून त्यासाठी तुमच्या हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, जिल्हा परिषदचे माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, जिल्हा परिषद च्या माजी सभापती शर्वाणी गांवकर, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, तालुका उपाध्यक्ष शेखर गांवकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, सिद्धेश कांबळी, रुपाली शिरसाट आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत आहोत. मात्र, विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाही. देशाचे नेतृत्व करू शकणारा एकही नेता त्यांच्याकडे नाही. राहुल गांधी टी-शर्ट परिधान करून व दाढी वाढवून मार्गक्रमण करीत आहे. मात्र, देशातील जनतेच्या प्रश्नांचा कोणताही अभ्यास त्यांच्याकडे नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवछत्रपतींचे नाव घेऊन आपले घर चालवले. जनतेच्या घराशी त्यांच्या सुखदुःखाशी त्यांना कोणतेच सोयरसुतक नाही. सोबतची माणसं सोडून गेली, पक्ष संपवला, धनुष्यबाण चिन्हही गेले आता मशाल घेऊन कोणाची घरे जळायला निघालात, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
कोकणचा विकास हा माझा ध्यास आहे. कारण माझा जन्म येथे झाला. येथील लोकांनी मला विविध पदांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहिले आहेत. मी या जिल्ह्यात तीस वर्षांपूर्वी आलो तेव्हा हा जिल्हा दरिद्री व गरीब जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्याचवेळी मी शपथ घेतली होती की ही परिस्थिती मी लवकरच बदलेल. त्यानंतर या जिल्ह्यातील सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. आता रोजगाराचा मूलभूत प्रश्न शिल्लक असून तो देखील मार्गी लावणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मोदी साहेबांच्या नावाने मते मागून व भाजपच्या सहकार्याने येथे दोन टर्म खासदार राहून देखील कोणताही विकास करू न शकलेले आता मतासाठी पुन्हा जनतेच्या दारात फिरत आहेत. विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याने केवळ टीका करून तसेच खोटे सांगत जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता केंद्रात आमची सत्ता आहे भविष्यातही ती पुन्हा येणार आहे. राज्यातही महायुतीचेच सरकार आहे मग हे आता कोणत्या माध्यमातून विकास साधणार आहेत. विकास करण्यासाठी तसा दृष्टिकोन असावा लागतो. मात्र, वैचारिक व बौद्धिक क्षमता नसलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या निवडणुकीत कायमचे घरी पाठवा व मोदी सरकारच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास साधा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.










