महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांचा विजय निश्चित : विशाल परब

सावंतवाडी । प्रतिनिधी : लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांना प्रचारादरम्यान मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता त्यांचा अडीज ते तीन लाख मताधिक्याने विजय निश्चित आहे, असा दावा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केला.
तर उद्याची निवडणूक ही देशाच्या भवितव्याची आणि रोजगाराच्या दृष्टीने वाटचाल करणारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले. सावंतवाडीतील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, अमित परब, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लढाई कोण्या व्यक्तीविरोधात किंवा पक्षाविरोधात नाही तर त्यांची लढाई ही अन्य देशांशी स्पर्धा करणारी आहे. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जनतेचा आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळमळीने प्रचारामध्ये सहभाग घेऊन प्रंचड मेहनत घेतलेली आहे. या निवडणुकीदरम्यान उबाठा तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे. त्यामुळे या ठिकाणी महायुतीचाच विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

गेल्या दहा वर्षाचा विचार करता येथील खासदाराने विकासात्मक बाबतीत कुठली छाप पाडलेली नाही. दहा वर्षात त्यांनी काहीही काम केलेले नसल्यामुळे मतदारसंघातील जनतेत त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कामाचा आवाका पाहता जनतेत त्यांच्याबद्दल विश्वास असून जनता त्यांच्या निश्चितच पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.