प्रशासन सज्ज, १ हजार ५१६ अधिकारी नियुक्त

राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा निवडणूकीसाठी मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी राजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ३४१ मतदान केंद्रावर होणाऱ्या मतदानासाठी सुमारे दोन हजार अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या निवडणूकीसाठी २ लाख ३३ हजार ७२१ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
लोकसभा निवडणूकीतील रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीमध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे, महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासह मोठ्यासंख्येने उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत.
या निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राजापूरमध्ये २००, लांजा येथे ११४ आणि संगमेश्वर येथे २७ अशी मिळून ३४१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या प्रत्येक मतदान केंद्रासाठी चार कर्मचारी असे १ हजार ५१६ अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी, केंद्राधिकारी, अन्य कर्मचारी आदींचा समावेश आहे.
मतदानाच्यावेळी शांतता आणि सुव्यवस्था रहावी यासाठी ४६४ पोलिस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आलेली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या कंट्रोल रूममधून आपापल्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदानाचे साहित्य घेवून सोमवारी रवाना झाले. त्यासाठी ५४ एसटी गाड्या, ३ जीप अशा मिळून ५४ गाड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, ज्या मतदान केंद्रावर इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे अशा १७१ मतदान केंद्रावर वेबकास्टींगही करण्यात आलेले आहे. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील ९४, लांजा तालुक्यातील ५८ आणि संगमेश्वर येथील १९ मतदान केद्रांचा समावेश आहे. उद्या होत असलेल्या मतदानामध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातील २ लाख ३३ हजार ७२१ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. त्यामध्ये १ लाख १ हजार ८५५ पुरूष तर, १ लाख २१ हजार ८६६ महिला मतदारांचा समावेश आहे.











