खेड(प्रतिनिधी) गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून कोकणवासीयांची आरक्षित तिकिटे काढण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत प्रतीक्षा यादीचे फलक लागून, प्रतीक्षा यादीची मर्यादाही संपल्याचे संदेश नागरिकांना येऊ लागले आहेत. कोकणकन्या एक्स्प्रेसचे आरक्षण सुरू झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटांतच प्रतीक्षा यादी ५०० पार गेली. त्यामुळे यात तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून मुंबई महानगरातील कोकणवासीय कोकणातील मूळ गावी जाण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार गणेश चतुर्थीच्या एक आठवडा आधीच कोकणात जाण्याचे नियोजन केले आहे. भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण रेल्वे सुटण्याच्या १२० दिवसापासून
आधीच सुरू होते
जनशताब्दी एक्स्प्रेसच्या द्वितीय आसन श्रेणीची प्रतीक्षा यादी ४ सप्टेंबर रोजी ‘रिग्रेट’ दाखविण्यात येत होती. तसेच कोचुवेली एक्स्प्रेसचे शयनयान, द्वितीय श्रेणी वातानुकूलित तृतीय श्रेणी वातानुकूलित असे सर्व डब्याची प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’ होती. यासह मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस आणि नेत्रावती एक्स्प्रेसचे शयनयान, द्वितीय श्रेणी वातानुकूलित तृतीय श्रेणी वातानुकूलित, वातानुकूलित ३ इकॉनॉमी डबा ‘रीग्रेट’ मध्ये होता. श्री गंगानगर- कोचुवेली एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेसचे शयनयान डबे ‘रिग्रेट’ होते. तर, वंदे भारतच्या वातानुकूलित चेअर कार डब्याची प्रतीक्षा यादी १६८ होती.










