मावळंगे गावात माकडांचा उच्छाद,आंब्यांचे मोठे नुकसान

माखजन |वार्ताहर : 

संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे गावात माकडांनी उच्छाद मांडला आहे.यामध्ये आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सेवानिवृत्त शिक्षक व आंबा व्यवसायिक भालचंद्र बापट यांनी,शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.

माकडांची टोळी आल्यावर शेकडो आंबे चावून खाली टाकत असल्याचा प्रकार येथे होत आहे.माकडांकडून नुकसान होत असल्याने आंबे लागून देखील हातात काहीच येत नसल्याचे श्री बापट यांनी सांगितले. हिच परिस्थिती माखजन,धामापूर,करजुवे,पेढांबे आदी भागात असल्याने येथील आंबा व्यवसायिक व शेतकरी हवालदील झाले आहेत.दिवसेंदिवस माकडांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने आंबा बागायतदार व हिवाळी पिक घेणारे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.येणाऱ्या अधिवेशनात शासनाने यावर ठोस उपाय योजना करावी अशी मागणी भालचंद्र बापट यांनी केली आहे.