भाजपा जिल्हा प्रवक्ते विष्णु मोंडकर
मालवण | प्रतिनिधी : कोकण विकासाठी गेले 30 वर्ष पेक्षा जास्त कार्य करणारे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील मतदार जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा हा विजय असून या विजयामुळे कोकण विकासाला नवसंजीवनी मिळेल. अशी भावना भाजपा जिल्हा प्रवक्ते विष्णु मोंडकर यांनी ना. नारायण राणे यांच्या विजयानंतर व्यक्त केली आहे.
लोकसभा मतदारसंघ निरीक्षक सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची भूमिका या विजयात किंगमेकर राहिली. तसेच सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे नियोजन, अतुल काळसेकर, भाजपा नेते निलेश राणे, आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या विजयात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या सर्व युतीच्या कार्यकार्त्यानी नेत्यांनी प्रामाणिक पणे केलेल्या मेहनतीचा हा विजय आहे.
माजी खासदार विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांनी आत्मचिंतन करावे. प्रत्येक वेळी दहशतीचा मुद्दा समोर करून प्रत्येक वेळी जनतेला दिशाहीन करता येत नाही हे मतदार संघाच्या जनतेने दाखवून दिले आहे. यापुढे कोकणच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक रोजगार विकासाचे पर्व अधिक गतिमानपणे सुरु होण्याचा मार्ग तयार झाल्याचे विष्णू मोंडकर प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग यांनी व्यक्त केले आहे.












