निरोगी जीवनासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व : युवराज लखम राजे भोसले 

 

सावंतवाडी राजवाडा येथे ऑर्बिट योगाने साजरा केला जागतीक योगा दिन 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सध्याच्या धावपळीच्या जीवनात योगाचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

योगाभ्यासामुळे शरीर तंदुरुस्त राहून निरोगी राहते व हीच निरोगी जिवनाची खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले यांनी केले.

सावंतवाडी राजवाडा येथील सभागृहात जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑर्बिट योगा स्टुडिओने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे,माजी उपनगराध्यक्ष सौ. अन्नपूर्णा कोरगावकर,पतंजलीचे महेश भाट, प्रशिक्षक अमोल सोनावणे, ऑर्बिट योगा स्टुडिओचे मालक विनिश तावडे, रीया रेडीज, प्रशिक्षिका मोहिनी मडगांवकर आदी उपस्थित होते.

ऑर्बिट योगा स्टुडिओचे मालक विनित तावडे यांनी निरोगी जिवन जगण्यासाठी जे लागते ते ओळखून हा अत्याधुनिक योग स्टुडिओ सुरु केला असून या योग स्टुडिओने अनेकांना निरोगी बनवले आहे. तज्ञ शिक्षक व योग्य मार्गदर्शन यामुळे अल्पावधीतच हा योग स्टुडिओ नावारुपाला आला, असे गौरवोद्गार देखील युवराज लखम राजे यांनी काढले.

तर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी शुभेच्छा देताना योग साधना ही निरोगी जिवनाची गुरुकिल्ली आहे. कुठल्या आजारावर कोणती योग प्रकार केला पाहिजे तसेच कोणता योग प्रकार केल्यास त्रास अधिक वाढु शकतो हे फक्त योग शिक्षकच सांगू शकतो म्हणून यू ट्यूबवर बघून योग करणे टाळा व ऑर्बिट योगा मधील तज्ञ शिक्षक अमोल सोनावणे यांना गुरु करा, असे आवाहन त्यांनी केले.

सावंतवाडीत मँगो हाॅटेलच्या आवारात सुरु असलेल्या या योगा स्टुडिओने अल्पावधीतच नाव केले आहे. अनेक जण या योग स्टुडिओचा लाभ घेऊन आजार मुक्त जिवन जगत आहेत असे सांगून दोन वर्षांपूर्वी लावलेले हे ऑर्बिट योगाचे रोपटे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी योग विद्यार्थ्यांचे ग्रुप करुन योगा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली व त्यांना नंबरही देण्यांत आले. सर्व यशस्वी योग विद्यार्थ्यांचा ट्राॅफी व मेडल देऊन गौरव करण्यात आला.