सिंधुदुर्ग पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत सुरू
सिंधुनगरी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग पोलीस भरती सुरू असून रविवारी बोलावण्यात आलेल्या ७६९ उमेदवारांपैकी ५०४ उमेदवार उपस्थित राहिले. त्यातून ४५३ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. रविवारी पावसाने मेहरबानी केल्यामुळे यातील सर्व उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पूर्ण झाल्या. कागदपत्र पडताळणी, शारीरिक पडताळणी व मैदानी चाचण्या नियोजनाप्रमाणे वेळेत पूर्ण झाल्या. आज दिवसभर पावसाने व्यत्यय न आणल्यामुळे सायंकाळी चार वाजण्यापूर्वीच सर्व चाचण्या पूर्ण करून मोकळे झाले.
जिल्हा पोलीस दलाने 1 जुलै रोजी आठ हजार बेचाळीस उमेदवारांना बोलावून ही भरती पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते. मात्र एक दिवस पावसामुळे वाया गेल्यामुळे त्या उमेदवारांची मैदानी चाचणी होऊ शकली नाही. ज्या उमेदवारांची मैदानी चाचणी झालेली नाही त्या उमेदवारांना चार दिवस आगाउ कळवून त्यांची मैदानी चाचणी पूर्ण केली जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी जाहीर केले आहे.
सिंधुनगरी येथील जिल्हा पोलीस परेड ग्राउंड वर १४२ पदांसाठी पोलीस भरती सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वा कडक निगराणीखाली ही भारतीय प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वीच्या काही भरत्या मधें उमेदवारांच्या अनेक तक्रारी असत असा अनुभव असे. मात्र यावेळची सिंधुदुर्ग पोलीस भरती प्रक्रिया कोणत्याही तक्रारी विना पारदर्शकपणे व सुरळीतपणे सुरू आहे.











