हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारांना नगराध्यक्षांचा कारवाईचा इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरातील पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी आज आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेऊन शहरातील सर्व नाले आणि गटारांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करण्याचे कडक निर्देश दिले.
शहरात सध्या गॅस आणि वॉटर पाईपलाईन टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या कामासाठी खोदलेली माती आणि ढिगारे अनेक ठिकाणी थेट गटारात साचल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. याची गंभीर दखल घेत नगराध्यक्षांनी संबंधित कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरले. ज्या ठिकाणी पाईपलाईनच्या कामामुळे गटारे मातीने भरली आहेत, ती स्वखर्चाने त्वरित साफ करून मातीची योग्य विल्हेवाट लावावी, असे आदेश त्यांनी दिले. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शहरातील मुख्य नाले आणि अंतर्गत ड्रेनेज लाईनची साफसफाई युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेगाने व्हावा आणि रोगराई पसरू नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करावे, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. “नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे. पाईपलाईन कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे गटारे तुंबली असल्यास ती साफ करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे, यात कोणतीही टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
या बैठकीस नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच गॅस व नळपाणी पुरवठा कामाचे ठेकेदार उपस्थित होते.












