मोरी खचल्याने लांजा- खोरनिनको रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प
लांजा | संतोष कोत्रे – लांजा खोरनिनको मार्गावर लक्ष्मी मंदिर ते चौगुले दुकानदार दरम्यान मोठ्या वहाळावर असलेली मोरी खचली असून रस्त्याच्या मधोमध भलेमोठे भगदाड पडले आहे .त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही घटना आज शुक्रवार दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
लांजा खोरनिनको मार्गावर सतत रहदारी सुरू असते. या मार्गावर लक्ष्मंमी दिर ते चौगुले दुकान या दरम्यान असलेली वहाळावरील मोरी ही मे महिन्यातच खचली होती. मात्र बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष करत या मोरीच्या वरच्या बाजूस असलेली मोरीचे नव्याने बांधकाम केले होते .मात्र खचलेल्या मोरीच्या बांधकामाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नव्हती किंवा नव्याने मोरीचे बांधकाम करण्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. उलट या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती.
आज पडलेल्या तुफानी पावसाचा फटका खोरनिनको रस्त्याला बसला असून या ठिकाणची मोरी ही खचली असून रस्त्याच्या मधोमध मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटीसह अन्य खासगी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले आहे.केवळ दुचाकी सारखीच वाहने या ठिकाणी जाऊ शकतात इतकी बिकट अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मे महिन्यातच याबाबत कार्यवाही करून या ठिकाणी नवीन मोरीचे बांधकाम केले असते तर आजची ही परिस्थिती उद्भवली नसती असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळेच आजची ही परिस्थिती उद्भवली आहे .त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले असून ग्रामस्थांसह विद्यार्थी वर्गाची देखील मोठी गैरसोय झाली आहे.












