वनविभागाकडून केवळ ५ झाडे तोडण्याची परवानगी
स्थानिकांची नाराजी
बांदा (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीतील धोकादायक झाडे वनविभागाकडून तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र वनविभागाने केवळ पाच धोकादायक झाडे तोडण्याची परवानगी दिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अद्यापही सुमारे ३० हून अधिक झाडे कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तरी वनविभागाने तात्पुरत्या स्वरूपात निदान त्या धोकादायक झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी उत्कर्ष कला क्रीडा मंडळ इन्सुली व स्थानिक ग्रामस्थानी केली आहे.
इन्सुली घाटीत अनेक धोकादायक झाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. वाहनांच्या वर्दळीच्या दरम्यान ही झाडे कोसळल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. याबाबत इन्सुली उत्कर्ष कला क्रीडा मंडळ व स्थानिक ग्रामस्थांनी धोकादायक झाडे तोडण्यासाठी वनविभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र वनविभाग केवळ कायद्याची बाजू पुढे करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बुधवारी या घाटीतील धोकादायक पाच झाडे तोडण्यात आली. याबाबत माजी आरोग्य व शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी वनविभागाकडे नाराजी व्यक्त केली. ३० हून अधिक झाडे धोकादायक स्थितीत असताना केवळ पाच झाडे तोडण्याची परवानगी कशी दिली ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भविष्यात मोठी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी वनविभाग घेणार काय असा सवाल इन्सुली ग्रामस्थांनी केला आहे.









