आज विजयदुर्गमध्ये ९ वी सरखेल कान्होजी आंग्रे खुली जलतरण स्पर्धा

विजयदुर्ग ( प्रतिनिधी ): आज ऐतिहासिक विजयदुर्ग – वाघोटण खाडीमध्ये आरमारी गोदी ते विजयदुर्ग जेटी या दरम्यान ५०० मीटर ते ५ किमी अंतरामध्ये ९ वी सरखेल कान्होजी आंग्रे खुली जलतरण स्पर्धा संपन्न होत आहे. यासाठी महाराष्ट्र, बेळगाव पासून पुरुष व स्त्री स्पर्धक सहभागी झालेले आहेत. स्पर्धकांच्या सुरक्षितता करिता तज्ञ डॉक्टर सहित ॲम्ब्युलन्स, यांत्रिक स्पीड बोटी, छोट्या बोटी, जीव सुरक्षा रक्षक, लाइफ बोया व लाइफ जॅकेट इत्यादी सर्व सुरक्षितता म्हणून दक्षता घेण्यात आली आहे.. या स्पर्धेसाठी राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष श्री आनंद माने, कोल्हापूर जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव ॲड. सुशील पाटील तसेच कोल्हापूर जिल्हा जलतरण संघटनेचे पदाधिकारी ॲड प्रविण भंडारी (नोटरी), संताजी घोरपडे यांचे थेट वंशज विश्वनाथ घोरपडे सरकार तसेच राज्य जलतरण संघटनेचे स्पर्धा निरीक्षक कैलास आखाडे, राज्य जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष तथा ठाणे महानगरपालिकाचे नगरसेवक राजेश मोरे उपस्थित असणार आहेत. ही जलतरण स्पर्धा राज्यस्तरीय जलतरण संघटनेच्या मान्यतेने श्री दुर्गामाता कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, विजयदुर्ग, जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि किल्ले विजयदुर्ग बोटिंग सर्व्हिस यांच्या सहकार्याने घेण्यात येणार आहे. तरी विजयदुर्ग पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष आनंद देवरुखकर यांनी केले आहे.