चिपळुणातील नागरिकांचे वनविभागाला निवेदन, रस्त्यावर येऊ लागल्याने धोका
चिपळूण (प्रतिनिधी):- शहरातील बाजारपेठेत शिवनदी पुलाजवळ भर रस्त्यात रात्रीच्यावेळी आलेल्या अजस्त्र मगरीच्या मुक्त संचारामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात शहरातील नागरिकानी गुरूवारी येथील – वनविभागाला पत्र देऊन मगरीपासून नागरिकाना भयमुक्त करावे, असे पत्र दिले आहे. तर मगरींचा अधिवास असलेल्या शिवनदीत पुलाजवळच्या दोन्ही बाजूस संरक्षक जाळी बसवण्यात यावी, असे पत्र वनविभागाने नगरपरिषदेला पाठवले आहे.
शहरातील माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, कैसर देसाई, समीर कोवळे, संतोष चोगले, निखिल पवार, अभिषेक कदम यांनी विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांना निवेदन दिले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चिपळूण शहर परिसरामधे शिवनदी व वाशिष्ठी नदी अशा दोन नद्या आहेत. या नद्यामधून गेल्या काही वर्षात मगरींचे वास्तव्य व वृष्दी होत आहे. या मगरी अनेकदा नदीच्या वरील काठावर येतात, तसेच आता तर भर हमरस्त्यावरदेखील फिरु लागल्या आहेत. या अगोदर विविध वस्त्यांमधेही त्या आलेल्या आढळल्या आहेत. या प्रकारांमुळे नागरिक भयभीत आहेत. विषेशतः रात्री-अपरात्री रस्त्यांवर फिरणे, वावरणे धोकादायक झाले आहे. शासनातर्फे या भितीदायक प्रकारांवर निश्चितच प्रतिबंध करणे आवश्यक आहे. आपण आपल्या खात्यातर्फे या मगरीचा त्वरीत बंदोवस्त करावा व आम्हा नागरिकांना मगरींपासून भयमुक करावे. पावसाळा सुरु झाला आहे. आता तर पुराचाही धोका असतो, अशा पुरातून या मगरी हमखास रस्त्यावर येतात. त्यामुळेही धोका आहे. शहरातील विविध तलाव, नाल्यांमधूनही त्यांचा वावर आहे. त्यामुळे याबाबत गाभीयनि निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हा नागरिकांना आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.
चौकट
पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षके जाळी बसवावी
शिवनदी पुलावर नदीमधून मगर रस्त्यावर चालत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयाव्दारे प्रसिध्द झालेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये मितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवनदीमध्ये मगरीचा अधिवास असून मगर नदीपात्रातून बाहेर न येण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षित जाळी बसवणे आवश्यक असल्याचे पत्र वनविभागाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवले आहे. त्याचबरोबर चिपळूण वनविभागाचे बचाव पथक सुसज्ज यंत्रणेसह तयार असते. याशिवाय वनविभागाचा स्वतंत्र टोल फ्री क्रमांक १९२६ हा असून मगर अथवा इतर वन्यप्राणी लोकवस्तींमध्ये आल्याबाबत आपत्कालीन कक्षास, वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











