वन महोत्सवानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन

सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी, कांदळवन संवर्धन विभाग आणि मराठा मंदिर अ.के.देसाई हायस्कूलचा राष्ट्रीय हरित सेना विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सवानिमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन दिनांक ४ जुलै २०२४ रोजी करण्यात आले होते. या वृक्षदिंडीत इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी व राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. वृक्षदिंडीची पालखी सजवून त्यामध्ये झाडांची रोपे ठेवून त्यांचे वाजत गाजत घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. प्रथम वृक्षदिंडीची पालखी प्रशालेचे मुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा दळी व सामाजिक वनीकरणाच्या अधिकारी एफ. आर. ओ. स्नेह अडसूळ यांनी आपल्या खांद्यावर घेऊन वृक्षदिंडीला सुरुवात केली . त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी पालखी घेऊन एक प्रदक्षिणा पूर्ण केली . या दिंडी द्वारे झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश दिला.

 

त्यानंतर मुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा दळी व सामाजिक वनीकरणाचे अधिकारी आर. एफ. ओ. सौ. स्नेहल अडसूळ यांचे शुभहस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्याच बरोबर राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात वृक्षारोपण केले व विद्यार्थ्यांनी हि झाडे आम्ही नक्कीच जगवू असा आत्मविश्वास व्यक्त केला. वृक्षदिंडी निमित्त विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शनासाठी समारंभ घेण्यात आला. प्रथम उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन मुख्याध्यापकांनी स्वागत केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी रणजीत सुवारे व अच्युत गजबिये उपस्थित होते. उपरोक्त कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांतर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांमुळे शाळेच्या अनेक गरजा पूर्ण होत आहेत त्याबद्दल श्रीमती दळी मॅडम यांनी समाधान व्यक्त केले. वृक्ष आपले सगे , सोयरे, मित्र आहेत, जगण्यासाठी वृक्षांचे महत्त्व गोष्टी रूपाने श्रीमती दळी मॅडम यांनी सांगितले. माजी विद्यार्थी रणजीत सुवारे यांनी वृक्षदिंडी, वृक्षारोपण या उपक्रमांचे स्वागत करून भविष्यात माझे हायस्कूलला काही कमी पडू देणार नाही असे मत व्यक्त केले. सामाजिक वनीकरणाचे अधिकारी सौ. स्नेहल अडसूळ यांनी झाडे आपल्याला कोट्यावरील रुपयांचा ऑक्सिजन मोफत देतात. त्यामुळे झाडांच्या जगण्यातच आपलं जगणं आहे. त्यासाठी झाडांची संख्या वाढली पाहिजे तरच पृथ्वीचा समतोल टिकून राहील.

 

झाडे लावण्यापेक्षा वृक्षारोपण केलेली झाडे जगली पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. झाडांची संख्या वाढवण्यासाठी seed ball सारख्या उपक्रमाचे आयोजन भविष्यात या प्रशाळेत करण्यात येईल . आजचा उपक्रम सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी झाला असे मत व्यक्त करून श्रीमती अडसूळ मॅडम यांनी सर्वांना धन्यवाद दिले. या संपूर्ण कार्यक्रमाला श्री निलेश कुंभार वनपाल, सौ. मिताली कुबल वनरक्षक, सौ . शर्वरी कदम वनरक्षक, श्री प्रभू साबणे वनरक्षक, श्री किरण पाचारणे वनरक्षक कांदळवन, श्री स्वस्तिक गावडे रत्नागिरी यांची विशेष उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सौ. शर्वरी कदम व श्री संतोष गार्डी, जयसिंग लोहार, श्री सचिन मोहिते यांनी नीटनेटके केले होते त्यामुळे कार्यक्रमाचा मुख्य हेतू साध्य झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष गार्डी यांनी केले तर आभार सचिन मोहिते यांनी मांडले.