रस्त्या- रस्त्यांवर साचलेला चिखल बाजूला करण्यास सुरुवात
चिपळूण नगरपरिषद कर्मचारी प्रयत्न सकाळीच कार्यरत
चिपळूण (संतोष सावर्डेकर): जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाने चिपळूण तालुक्याला गेली दोन-तीन दिवस चांगले झोडपून काढले. वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. चिपळूण शहरातील मुंबई- गोवा महामार्गावरील डीबीजे महाविद्यालयासमोरील रस्त्यावर ओझरवाडी डोंगराचे पाणी अडून राहिल्याने येथील रस्ता पाण्याखाली गेल्याचे पहावयास मिळाले. तर चिपळूण शहरातील चिंचनाका, वडनाका, रंगोबा साबळे रोड, भाजी मंडई परिसर बाजार पूल, शंकरवाडी मुरादपूर रोड आदी परिसरात पूर स्थिती झाली होती. या परिस्थितीवर चिपळूण प्रशासनाने विशेष लक्ष ठेवून नागरिकांची कोणती गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले. तर सोमवारी पूर स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर चिपळूण नगरपरिषदेने रस्त्या-रस्त्यांवर साचलेले चिखल बाजूला करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चिपळूणमध्ये चांगलाच पाऊस पडत आहे. तर शनिवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसाने रविवारी दिवसभर चिपळूणला चांगलेच झोडपले. या पावसाने वाशिष्ठी, शिवनदीसह ग्रामीण भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली होती. नदीच्या पाण्याची पातळी ५.२४ मीटरपर्यंत गेली होती. चिपळूणमधील मुंबई- गोवा महामार्गावरील डीबीजे समोरील रस्त्यावर डोंगराकडील पाणी रस्त्यावर आले व त्या पाण्याचा निचरा होण्यास कोणताही मार्ग नसल्याने ते पाणी रस्त्यावर सुमारे दीड फूट साचून राहिले. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे पहावयास मिळाले. तर चिपळूण शहरातील चिंचनाका, वडनाका, अनंत आईस फॅक्टरी, जुना भैरी मंदिर परिसर, शंकरवाडी, मुरादपूर रोड, रंगोबा साबळे रोड, भाजी मंडई परिसर, चिपळूण बाजारपेठ, बाजार पूल परिसर, मिरजोळी रोड यासह शहरातील अन्य रस्त्यांवर पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नागरिकांचे हाल झाले. व्यापाऱ्यांनी आपला दुकानातील माल सुरक्षित हलवला. तर नागरिकांनी आपली वाहने देखील सुरक्षित उभी करून ठेवली.

*चिपळूणचे प्रशासन राहिले अलर्ट मोडवर; नागरिकांमधून होतेय कौतुक!*
या सर्व परिस्थितीवर प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीयगीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांच्यासह अन्य अधिकारी लक्ष ठेवून होते. एनडीआरएफची पथके तसेच महसूल, नगरपरिषद, महावितरण आदी विभागाची पथके तैनात ठेवण्यात आली होती. होड्या देखील सज्ज ठेवण्यात आले होत्या. चिपळूण मधील पूर परिस्थितीवर प्रशासन संपूर्ण रात्र लक्ष ठेवून होते प्रशासनाच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
*चिपळूण नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांवरील चिखल बाजूला सकाळपासूनच करण्यास सुरुवात*
सोमवारी सकाळी काही रस्त्यांवरील पाणी ओसरल्यानंतर मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्या -रस्त्यांवरील चिखल बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी रस्त्यांवर चिखल बाजूला करण्याबरोबरच पाणी मारून रस्ते स्वच्छ केले जात आहेत. तर काही सखल भागातील रस्त्यांवर पाणी असल्याचे दिसून येत आहे.
*मतेवाडीत वीजपुरवठा खंडित*
चिपळूण शहरातील मतेवाडीतील रस्त्यालगत असलेले नारळाचे झाड इलेक्ट्रिक पोलवर जाऊन अडकल्याने त्या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्याची वेळ महावितरण विभागावर आली. यामुळे ६० विद्युत ग्राहकांचा विद्युत पुरवठा बंद राहिला. येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरण विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
*चिपळूण रेल्वे स्थानकात गंगानगर एक्सप्रेस उभी!*
कोकण रेल्वे खेड तालुक्यात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक बंद राहिली. यामुळे गंगा नगर एक्सप्रेस ही राजस्थानला जाणारी रेल्वे चिपळूण स्टेशनवर उभी आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत*
*परशुराम व कुंभार्ली घाट सुरक्षित*
परशुराम व कुंभार्ली घाटात कोणती दरड न कोसळण्याची घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
*तालुका चिपळूण पावसाची नोंद*
दिनांक 15.07.2024
*65.00 मि.मी. पेक्षा जास्त पाऊसाची नोंद खालीलप्रमाणे.*
1. चिपळूण – 243.0
2. खेर्डी – 238.0
3. वहाळ – 166.0
4. कळकवणे – 323.0
5. मार्गताम्हाणे – 108.0
6. शिरगांव – 195.0
7. रामपूर – 93.0
8. असुर्डे – 145.0
9. सावर्डे – 171.0
*एकूण – 1682.0*
*दिवसाची सरासरी – 186.88 मी. मी.*
*आज अखेर सरासरी एकूण 186.88+1734.46 = 1921.34 मि.मी.*
चिपळूण शहरा मध्ये काल रात्री झालेल्या अतिवृष्टी मुळे रस्त्या वर काही ठिकाणी आलेले चिखल तसेच शहरामध्ये झालेल्या किरकोळ दरडीचा घसरलेल्या भागाची व शहरामधील उर्वरित भागाची मुख्याधिकारी विशाल भोसले तसेच मंगेश पेढांबकर अनंत मोरे वैभव निवाते महेश जाधव विनायक सांवत यांनी पहाणी करून रस्ते साफ सफाई व स्वच्छता नगर पालिका कर्मचारी यांच्या मार्फत सुरू करण्यात आली आहे












