कामगारांनी लाभ घ्यावा : शहर प्रमुख उमेश येरम
वेंगुर्ले | प्रतिनिधी : शासनाच्या असंघटीत बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी वेंगुर्ले शिवसेनेतर्फे शहर प्रमुख उमेश येरम यांनी पुढाकार घेत सप्तसागर येथील शिवसेना कार्यालयात नोंदणी कक्ष कार्यान्वित केला आहे. या बांधकाम कामगार नोंदणी कक्षाचा शुभारंभ आज मंगळवारी सकाळी करण्यात आला. कामगारांनी या नोंदणी कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन उमेश येरम यांनी केले आहे.
शासनाने सर्वसामान्य क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटीत बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी योजना कार्यान्वित केलेली आहे. या योजनेचा लाभ अनेक बांधकाम कामगारांना आँनलाईन अर्ज भरताना तसेच आँनलाईन नुतनीकरण करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन शासनाच्या बांधकाम कामगारांसाठीच्या योजनेचा लाभ तळागाळातील बांधकाम कामगारांना व्हावा. या उद्देशाने वेंगुर्ले शहरातील मारूती स्टॉप लगतच्या सप्तसागर कॉम्प्लेक्स मधील वेंगुर्ला तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात दर मंगळवारी वेंगुर्ले तालुक्यातील बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी तसेच आँनलाईन नुतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या कामगार अधिकारी कार्यालयात काम केलेल्या अनुभवी व्यक्ती असलेले किरण कुबल यांची बांधकाम कामगार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती शिवसेनेमार्फत करण्यात आलेली असून दर मंगळवारी हि नोंदणी केली जाणार आहे.
आज शुभारंभ प्रसंगी शिवसेना वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम, युवा शहर प्रमुख संतोष परब, ॲड. श्रद्धा बाविस्कर, मनाली परब, शबाना शेख, प्रभाकर पडते, किरण कुबल, संजय परब, वासुदेव परब, गणपत केळुस्कर यांच्या सह शिवसेना कार्यकर्ते व व सर्व बांधकाम कामगार उपस्थित होते. बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी व नुतनीकरणासाठी कोणकोणती कागदपत्रे नोंदणीसाठी लागतील. याची माहिती नोंदणीचे फाँर्म देताना शिवसेनेचे बांधकाम कामगार प्रतिनिधी किरण कुबल हे देतील.
दरम्यान वेंगुर्ले शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागात बांधकाम व्यवसायांत काम करणाऱ्या पुरूष व महिलांनी दर मंगळवारी शासनाच्या असंघटीत बांधकाम कामगार या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम व तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले आहे.












