शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले यांची माहिती
राजापूर (वार्ताहर): वादळी पावसामध्ये पिंपळाचे झाड पडून नुकसान झालेल्या राजापूर तालुक्यातील शिवणे बुद्रुक जिल्हापरिषद शाळेच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 16 लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती शिवसेना तालुकापमुख दिपक नागले यांनी दिली.
मंगळवारी राजापूर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामध्ये जुनाट पिंपळवृक्ष पडून शिवणे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका स्वच्छतागृहासह दोन वर्गखोल्या जमीनदोस्त झाल्याची घटना घडली. धोकादायक इमारतींमध्ये मुलांना न बसविण्याची शिक्षण विभागाकडून आधीच देण्यात आलेली सूचना आणि शैक्षणिक सप्ताह कार्यक्रमानिमित्ताने सर्व विद्यार्थी अन् शिक्षक सुरक्षित असलेल्या दुसऱ्या वर्गखोलीमध्ये बसलेल्या असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमध्ये शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान बुधवारी शिवसेना तालुकापमुख दिपक नागले यांच्यासह अपूर्वा सामंत यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. यावेळी नागले यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पालकमंत्री उदय सामंत यांना शाळेच्या नुकसानीची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पालकमंत्री ना.सामंत यांनी शाळेच्या दुरूस्तीसाठी निधी देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतून दोन वर्गखोल्या तसेच स्वच्छता गृहाच्या बांधकामासाठी सुमारे 16 लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती श्री.नागले यांनी दिली.









