खेड (प्रतिनिधी) मुसळधार पावसामुळे येथील जगबुडी आणि नारंगी नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडल्याने आतापर्यंत ४ वेळा पुराचे पाणी शहरातील सखल भागात शिरले. तसेच नदीकिनारील गावांमध्येही पाणी शिरले. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार पुरामुळे ४०४ दुकाने, १३३ घरे अशा एकूण ५३७ नुकसानग्रस्तांचे ७ कोटी २० लाख १४ हजार २९० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसिलदार सुधीर सोनावणे यांनी दिली.
शहरातील सफा मशिद चौकातून वालकी गल्ली, गांधी चौक, निवाचा तळ, बाजारपेठ, पांगारकर मोहल्ला, पोत्रिक मोहल्ला, मटन मच्छिमार्केट, तीनबत्ती नाका, नवीन/जुने मुकादम कॉम्प्लेक्स, शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे कोवीड सेंटर, ब्राह्मण आळी, कासार आळी आदी भागात पुराचे पाणी शिरले.
जगबुडी नदी पात्राच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या भोस्ते, निळीक, अलसुरे, कोंडीवली आणि खाडीपट्टयातील गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. ७ पथकांमार्फत नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला. शासनाने पुराच्या पाण्यामुळे नुकसानग्रस्त व्यापारी बंधुच्या दुकानांचे आणि घरांचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई लवकरात लवकर अदा करावी. तसेच २०२३ मध्ये झालेल्या नुकसानीत ज्यांना भरपाई मिळाली नाही, त्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून होत आहे.








