साटवली हायस्कूल व ब्रिज येथील खड्डे बांधकाम खात्याकडून भरण्यास सुरुवात 

 

 

दै. प्रहार आणि प्रहार डिजिटलच्या वृत्ताची दखल, ग्रामस्थांतून समाधान 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील साटवली हायस्कूल नजीकच्या ब्रिज व परिसरात साटवली-इसवली रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास आज मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबतचे वृत्त दैनिक प्रहार आणि प्रहार डिजिटल ने सडेतोडपणे मांडले होते.

लांजा साटवली-इसवली हा कायम वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावरून दररोज एसटीच्या दहा ते बारा फेर्या सुरू असतात .त्याचप्रमाणे अन्य खाजगी वाहतूक देखील सुरू असते .मात्र या साटवली हायस्कूल नजीक वहाळावर नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रिजसह रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात सध्या पावसाचे पाणी साचून या पाण्यामुळे या रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकेक खड्डा हा मोठा खड्डा असल्याने त्याचा त्रास हा तिथून प्रवास करणारे पादचारी, वाहन चालक आणि विद्यार्थी यांना सहन करावा लागत होता. त्यामुळे भविष्यात अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न जितेंद्र चव्हाण यांनी केला होता.

याबाबत आज मंगळवारी दै. प्रहारने वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेत भाजपा पदाधिकारी जितेंद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे आज मंगळवारपासून येथील खड्डे भरण्यास बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि वाहन चालक, शालेय विद्यार्थी यांची गैरसोय दूर होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे