मेंदू मृतावस्थेत असलेल्या पत्नीचे हृदय व डोळे केले होते दान
मसूरे | झुंजार पेडणेकर : केईएम रुग्णालयामध्ये मेंदू मृतावस्थेत असलेल्या पत्नी सई परब हिचे हृदय व डोळे दान करण्याचा निर्णय घेणाऱ्या मुळ वेंगुर्ले – भोगवे व नोकरीं निमित्त कल्याण येथे राहणाऱ्या दीपक परब यांचा केईएम हॉस्पिटल तसेच रिजनल अँड स्टेट ऑर्गन अँड टिशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन म्हणजेच रोटो-सोटो ह्या केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह, तसेच रोटोसोटो तर्फे स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन के ई एम हॉस्पिटल येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. राहुल वासनिक, रोटोसोटोचे संचालक डॉ. आकाश शुक्ला व सहसंचालक डॉ. तुकाराम जमाले, तसेच अन्य सोशल वर्कर्स व डॉक्टर्स उपस्थित होते. सई हिला केईएम मध्ये ऍडमिट केल्यापासून अखेरपर्यंत अनेक डॉक्टर्सनी सहकार्य केले. तर काही डॉक्टर्स तर बारा बारा तास सईच्या बाजूला बसून सारखे अपडेट्स घेत होते हे बघून फार समाधान वाटले. केईएमच्या सर्व डॉक्टरांनी शंभर टक्के पेक्षा जास्तच मदत केली असून, त्यांचे मी शतशः आभार मानत आहे असे दीपक परब म्हणाले. दीपकचे काका रघुवीर वायंगणकर यांनी सई हिस केईएम रुग्णालयामध्ये आणल्यापासून एम आय सी यु मध्ये या वार्डमध्ये दाखल करेपर्यंत उपस्थित असलेल्या डॉक्टर्सनी सतत आम्हाला ट्रीटमेंट बाबत माहिती दिली. व वेगवेगळे रिपोर्ट मागविले. या काळात सुद्धा डॉक्टरांनी जराही हलगर्जीपणा केलेला नाही. तर सर्व स्टाफने फारच सहकार्य केल्याबद्दल व नवीन एमआयसीयू या वार्डाबद्दल ही समाधान व्यक्त केले. तर केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दीपक परब यांनी अवयव दानाचा निर्णय घेतल्यामुळेच आम्हाला गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासात हृदय ट्रान्सप्लांटमुळे केईएम सारख्या महापालिकेच्या सर्वसामान्य रुग्णालयाचे नाव देशात कोरण्यात यश मिळाले.
यामध्ये आमच्या सर्व डॉक्टरांचे यश आहे. तसेच यापुढेही अवयव दानासाठी प्रयत्न करावयास हवेत असेही रावत यांनी सांगितले. शेवटी दीपक परब आणि कुटुंबीयांचे त्यांनी स्वतः आभार मानले व भविष्यात काहीही काम असेल तर संपर्क साधा असे आवाहनही केले. यावेळी सुयोग काटकर, दीपक परब, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सईची बहीण शर्मिला शैलेश परब, रघुवीर वायंगणकर, सुनील कुष्टे उपस्थित होते.











