शहाजीराव खानविलकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
राजापूर (प्रतिनिधी): इतिहास लिहिणारे अनेकजण असतात, पण इतिहास घडविणारा कुणीतरी एकच असतो. ज्यांनी आपल्या शिक्षकी पेशात सचोटीने काम करत विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांना घडविले, त्यांच्यामध्ये संस्कार रूजवले आणि अनेक आदर्श पिढया निर्माण केल्या ते गुरूवर्य शहाजीराव खानविलकर म्हणजे चालते बोलते विद्यापिठच आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक म. बा. चव्हाण यांनी ओणी येथे केले.
ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने नुतन विद्यामंदिर ओणी प्रशाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुरूवर्य शहाजीराव खानविलकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सपत्नीक खानविलकर यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांच्या हस्ते हा जीवन गौरव पुरस्कार खानविलकर यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ओणीच्या गुरूवर्य शहाजीराव खानविलकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर समाजसेवक भाऊ वंजारे, सौ. शिलादेवी शहाजीराव खानविलकर, प्रदीप संसारे, डॉ. महेंद्र मोहन, गणपत भारती, रामचंद्र तुळसणकर, अरवींद गोसावी, महादेव धुरे, अॅड. गुरूदत्त खानविलकर, आत्माराम मेस्त्री, नाथ गांधी, निलेश खातू, गंगाधर तुळसणकर, महादेव धुरे, प्रमोद लिमये, विवेक सावंत, विजय वागळे, मंगेश खानविलकर, गणपत जानसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना चव्हाण यांनी खानविलकर यांनी श्रीकृष्णासारखं मार्गदर्शन केलेच पण कर्णासारखी मैत्री आणि दातृत्वही त्यांनी जोपासलं. आज समाजात अधपतन होत असताना अशा संस्काराची, संस्कारक्षम पिढी घडविणाऱ्या अशा गुरूवर्यांची आवश्यकता आहे. शहाजीराव खानविलकर यांनी केलेले काम आणि कार्य प्रेरणादायी आणि दीपस्तंभासारखे असल्याचे त्यांनी नमुद केले.
याप्रसंगी भाऊ वंजारे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत खानविलकर यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी भाई साखळकर, आत्माराम मेस्त्री, रामचंद्र तुळसणकर, महेश कुमार, महादेव धुरे, गंगाधर तुळसणकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या जीवन गौरव पुरस्कराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना शहाजीराव खानविलकर यांनी आपल्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या. आजपर्यंत आपल्याला मिळालेले पुरस्कार, आपण केलेले काम व कार्य आणि हा जीवन गौरव पुरस्कार हा माझ्या तमाम विद्यार्थ्यांचा गौरव असल्याचे त्यांनी नमुद केले.
तर आपल्या अध्यक्षीय भाषणात वासुदेव तुळसणकर यांनी आपल्या शालेय जीवनातील आठणींना उजाळा देत खानविलकर यांनी आपल्याला कसे घडविले हे सांगितले. तर सर आज हा जीवन गौरव पुरस्कार आपणाला देऊन मी कृतार्थ झाल्याची भावना तुळसणकर यांनी व्यक्त केली.
एक लाख एक हजार एकशे अकरा रूपयांचा धनादेश, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप होते. त्यांचे शिष्य वासुदेव तुळसणकर यांच्या हस्ते हा पुरस्कार खानविलकर यांना प्रदान करण्यात आला. तर खानविलकर यांची ग्रंथतुलाही करण्यात आली.
याप्रसंगी खानविलकर यांनी संस्थेला एक लाख रूपयांची देणगी दिली. तर जीवन गौरव पुरस्काराबरोबर त्यांना देण्यात आलेला एक लाख एक हजार एकशे अकरा रूपयांचा धनादेश त्यांनी संस्थेला परत देत आपण ही देणगी अन्य कोणत्याही संस्थेला द्यावी असे सांगितले. यावेळी संस्थाध्यक्ष तुळसणकर यांनी शहाजीराव खानविलकर यांनीच सुरू केलेल्या बॅ. नाथ पै ग्रंथालयाला ही देणगी देत असल्याचे जाहिर केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप संसारे यांनी केले. तर सुत्र संचालन प्रा. विनोद मिरगुले यांनी व आभार महेद्र पवार यांनी मानले.
या कार्यक्रमाला आजी माजी शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, खानविलकर यांचे नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी खानविलकर यांचा सन्मान केला.











