बारामती येथे ६ वी १७ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न..
वेंगुर्ले : दाजी नाईक :टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती येथे ६ वी १७ वर्षाखालील टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांचा संघ उपविजेता ठरला. या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन सिंधुदुर्ग कडून जिल्हास्तरीय निवड चाचणी दुर्गवाड ग्राउंड, कुडाळ येथे घेण्यात आली. त्या निवड चाचणी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुलांचा संघ निवडण्यात आला होता. यामध्ये निनाद सातोस्कर (कर्णधार), प्रथमेश साळगावकर, आयुष परब, तन्मय कांबळे, शाहिद चोचे (विकेट किपर), ऋषिकेश परब, सर्वेश तोरस्कर, दीप मोंडकर, रामकृष्ण शिरसाट, रवींद्र राऊत, सागर परब यांचा समावेश होता.
स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग संघाने गटातील पहिला सामना सांगली बरोबर गमावला. त्यानंतर पुढील दोन्ही सामने कोल्हापूर व नाशिक ग्रामीण या संघाबरोबर मोठ्या अंतराने जिंकून बाद फेरीत प्रवेश केला. त्यानंतर रत्नागिरी आणि पुणे संघाला पराजित करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. तिथे रायगड संघावर मात करून फायनल मध्ये धडक मारली.
स्पर्धेचा अंतिम सामना सातारा संघाशी होता हा सामना फार रोमहर्षक झाला आणि शेवटच्या चेंडू वरती निर्णय होऊन सातारा संघ वितेता ठरला तर सिंधुदुर्ग संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.यामध्ये निनाद सातोस्कर याला 3 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाले तसेच आयुष परब याला 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाले. सर्व खेळाडूंनी चांगला खेळ केला त्यामुळे संघ अंतिम सामन्यांमध्ये पोहचला. सिंधुदूर्ग जिल्ह्याला प्रशिक्षक कुणाल हळदणकर, राहुल धुरी व भुषण गावकर यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले.
यशस्वी खेळाडूंचे टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी मॅडम, सहसचिव चंद्रकांत तोरणे, खजिनदार घनश्याम सानप, धनश्री गिरी मॅडम, संदीप पाटील, महेश मिश्रा, सिद्धेश गुरव, सुमित अनेराव यांनी अभिनंदन केले आहे.










