Stoppers should be installed at Chiveli Phata to avoid increasing accidents
कुणबी युवा चिपळूणची राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागणी
चिपळूण | वार्ताहर : विजापूर – गुहागर महामार्गावरील उमरोली चिवेली फाटा येथे रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहने अती वेगाने येतात. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिवेली फाटा येथील अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवण्याबाबत कुणबी युवा चिपळूण संघटनेच्या वतीने उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग चिपळूण उपविभाग यांना निवेदन देण्यात आले आहे.
कुणबी युवा चिपळूण संघटनेमार्फत दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, गुहागर – विजापूर महामार्गावरील चिवेली फाटा या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर अपघातांची संख्या वाढली आहे. चिवेली फाटा येथे सुमारे दहा गावातील नागरिक विविध कामांसाठी आणि विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. हे ठिकाण नेहमीच गजबजलेले असते. मात्र या महामार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महिन्यातून दोन ते तीन अपघात होतच असतात. या घटनेची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे लक्ष देऊन चिवेली फाटा या ठिकाणी दोन्ही बाजूस गतीरोधक बसवावे यासाठीच कुणबी युवा चिपळूण तालुका अध्यक्ष पत्रकार संतोष कुळे, प्रभारी सचिव कल्पेश बाईत, संघटक भरत धुलप, नितेश खाडे, नितेश दुर्गोळी व पदाधिकारी यांनी आज उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग चिपळूण निवेदन दिले आहे.
याच निवेदनात त्यांनी दुसरी मागणी केली आहे की, याच महामार्गावर उमरोली गायकरवाडी बस थांबा शेजारी एक धोकादायक वळण आहे. तेथील रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. तरी तो रस्ता लवकरच सुस्थितीत करावा आणि या वळणावर होणारे अपघातांचे प्रमाण सुद्धा कसे टाळता येतील, याकडे सुद्धा लक्ष द्यावे असे सुचित केलेले आहे. कुणबी युवाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक विषयावरती प्रकाश टाकून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असते. चिवेली फाटा येथे लवकरात लवकर गतिरोधक बसवावेत अशी त्यांनी मागणी केली आहे.










