खेड न प कडील रस्ता सार्वजनिक बांधकाम कडे वर्ग करा

भाजपा शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांची मागणी
खेड(प्रतिनिधी) खेड नगर परिषदेच्या ताब्यात असलेला अण्णांचा पऱ्या ते डेंटल कॉलेज हा रस्ता  सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरण करावा अशी मागणी भाजपा चे खेड शहर अद्यक्ष अनिकेत कानडे यांनी मुख्याधिकारी
महादेव रोडगे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे
खेड शहरांतर्गत अण्णांचा पऱ्या ते डेंटल कॉलेज हा रस्ता सध्या नगरपालिकेच्या ताब्यात असल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अनेक वेळा अडचणीमध्ये सापडत आहे. हा रस्ता सद्य परिस्थितीत वाहतुकीसाठी अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे या रस्त्यावर रोजच वाहतुकीची कोंडी होत आहे  .
रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सुपूर्द झाल्यास, त्याचे रुंदीकरण शक्य होईल आणि वाहतुकीची कोंडी टाळता येईल. तसेच, रस्त्याच्या दुरुस्तीचे व विकासाचे काम अधिक प्रभावीपणे व तत्परतेने होऊ शकेल. यामुळे येथील नागरिकांना व वाहतूकदारांना चांगल्या सुविधा मिळतील.
दरम्यान  हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित करण्यासंबंधी योग्य तो प्रस्ताव तयार करून शासन दरबारी सादर करावा अशी मागणी कानडे यांनी निवेदनात नमूद केली आहे .