दाऊदच्या मुंबकेतील ४ जागांचा ५ जानेवारीला लिलाव

खेड | प्रतिनिधी : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मूळगाव असलेल्या खेडमधील मुंबके या गावातील चार जागांचा लिलाव ५ जानेवारी २०२४ रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दाऊदच्या जागांचा लिलाव करीत सरकारने दाऊदला मोठा धक्का दिला आहे.
चार शेतजमिनीचा होणारा लिलाव जवळपास २० गुंठ्याहून अधिक जागेचे क्षेत्र असून चार जमिनींपैकी एका जमिनीची किंमत नऊ लाख ४१ हजार २८० रुपये इतके आहे. तर दुसऱ्या शेतजमिनीची किंमत अंदाजे आठ लाख ८ हजार ७७० रुपये इतकी आहे. मुंबके परिसरातील दाऊद इब्राहिम यांच्या या चार जागा सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत २१ नोव्हेंबर २०२३ ला लिलावाबाबत नोटीसही काढण्यात आली होती.
दाऊद इब्राहिम याचे मूळ गाव खेड तालुक्यातील मुंबके हे असून आता भारत सरकारच्या साफेमा अर्थातच स्मगलिंग अॅण्ड फॉरेन एक्सचेंज मॅन्युफ्यूलेटर्सच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमच्या जागा आता सरकार ताब्यात घेत आहे. महत्त्वाचं म्हणजे याआधीही दाऊदचे गाव असलेल्या मुंबके येथे. त्याच्या आईच्या नावावर असलेला बंगला, समोरील आंब्याची बाग, तसेच लोटे येथील पेट्रोल पंपाची जागा अशाच पद्धतीने ताब्यात घेऊन साफेमाच्या माध्यमातून त्याचा लिलाव करण्यात आला होता.