लांजा पोलिस ठाण्यात विघ्नहर्त्या बाप्पाची प्रतिष्ठापना

 

 यावर्षी ६५ व्या वर्षात पदार्पण

 लांजा पोलीस ठाणे मार्फत सन १९५९ मध्ये प्रथम विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना

संतोष कोत्रे lलांजा :लांजा पोलीस ठाणे मार्फत येथील महापुरुष मंदिरात विघ्नहर्त्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे .या गणेशोत्सवाने या वर्षी ६५ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

कोकणात गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो .त्यामुळे प्रत्येक जण बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून असतात. मात्र पोलिसांच्या बाबतीत ही स्थिती नेमकी उलटी असते .याच कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवणे, कोणतीही गंभीर घटना घडू नये यासाठी करावा लागणारा बंदोबस्त यामुळे पोलिसांना मात्र आपल्या घरी विघ्नहर्ता आलेला असतानाही त्यांची सेवा करावयास मिळत नाही. अशी खंत मनातून बोचत असते. ही बाब लक्षात घेऊन त्यांनाही गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा या उद्देशाने लांजा पोलीस ठाणे मार्फत सन १९५९ मध्ये प्रथम चव्हाटा मंदिराच्या पाठीमागे गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर गेल्या २९ वर्षापासून लांजा पोलीस ठाण्याच्या आवारातील महापुरुष मंदिरात बाप्पांची प्रतिष्ठापना केली जात आहे .

कामाच्या व्यापातून थोडासा वेळ बाजूला काढून पोलिस ठाण्यातील प्रत्येक पोलिस कर्मचारी हा या विघ्नहर्त्याच्या सेवेत लीन होत असतो. अगदी या बाप्पांचे आगमन होण्याअगोदर मखर, आकर्षक विद्युत रोषणाई आदी कामांमध्ये सर्व पोलिस कर्मचारी मोठ्या तन्मयतेने आणि भक्तिभावाने सहभागी होतात. बाप्पांचे आगमन झाल्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी होणारी पूजाअर्चा, आरती यातही प्रत्येक पोलिस कर्मचारी मनापासून सहभागी होतो.

यावर्षी तालुक्यातील भंडे येथील मूर्तिकार – दीपक भडेकर यांचे हस्त कौशल्यातून साकारलेल्या बाप्पांची पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी प्रतिष्ठापना केली.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे,पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे,उप निरीक्षक अमोद सारंगले,उप निरीक्षक देवकन्या मैदाड,पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.