खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सध्या डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे पाळीव जनावरांची आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची आरोग्याच्या दृष्टीने मोठी गैरसोय होत आहे. राज्य सरकारने या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी खेड तालुक्यातील तळे गावातील प्रगतिशील शेतकरी व दुग्ध व्यवसायिक श्री प्रकाश पालकर यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या तुलनात्मक दृष्ट्या तशी मोठी आहे. बहुतांश दुग्ध उत्पादक शेतकरी पूर्णपणे मेहनतीने दुधाळ जनावरांचे संगोपन करून दुग्ध उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. मात्र दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक अशा सुविधा सरकार देत नसल्यामुळे या उत्पादक शेतकऱ्यांची परवड झाली आहे.
दुग्ध उत्पादनाच्या दरम्यान गाय आणि म्हशी यांसारख्या पाळीव जनावरांची निगा राखणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्या दृष्टीने वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवणे याविषयी या उत्पादक शेतकऱ्यांना सतर्क राहावे लागते. सध्याचा हंगाम हा गाई माजावर येण्याचा आहे. याच हंगामामध्ये गाईंना काळजीपूर्वक जपावी लागते. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. वारंवार बदलत असलेल्या हवामान गायीना पोषक असतेच असं नाही, त्या दृष्टीने गायींची निगा राखावी लागते आणि यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावे लागतात. मात्र खेड तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याची खंत श्री प्रकाश मालक पालकर यांनी व्यक्त केली आहे.
खेड तालुक्यातील तळे गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना असूनही तिथे डॉक्टर नसल्याने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. या हंगामात बऱ्याच ठिकाणी पाळीव जनावरांना विशेषता गाई व म्हशी यांना पायलाग सारखे आजार उद्भवले आहेत. अशावेळी त्यांच्यावर उपचार करून घेण्यासाठी डॉक्टर नसल्याने ही पाळीव जाणारी दगावण्याची शक्यताच अधिक आहे. वेळेवर उपचार न झाल्यामुळे दूध देणाऱ्या गाई व म्हशी यांचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार न झाल्यामुळे दूध देणाऱ्या गाई व म्हशी दूध द्यायच्या बंद झाल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे अभावी वेळेवर उपचार न झाल्याने दूध कमी झाले आहे. अनेक गावामध्ये गायीनी दूध देणे बंद केल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक दृष्ट्या देखील अडचणीत आले आहेत. दूध उत्पादना अभावी शेतकऱ्यांना आपल्या कर्जाचे हप्ते देखील वेळेवर देणे शक्य होत नाही. याची दखल सरकारने घ्यायला हवी.
सरकारने त्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे. शासकीय किंवा खाजगीत दूध संकलन केंद्रामध्ये वेळेवर दूध न दिल्यामुळे या पाळीव जनावरांना दररोज लागणारी खाद्य आणि औषधे खरेदी करताना शेतकऱ्यांना उसनवारी करावी लागत आहे. राज्य सरकारने एकीकडे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना किंवा शेती उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुधाळ जनावरे पुरवण्याची योजना सुरू केली आहे. परंतु ही जनावरे घेतल्यानंतर त्यांचे आरोग्य आबाधित राहण्याच्या दृष्टीने गावामध्ये किंवा नजीकच्या अंतरामध्ये वैद्यकीय अधिकारी जर नसेल तर शेतकरी आर्थिक दृष्ट्या देखील अडचणीत येणार आहे.
स्थानिक प्रशासनाने तळे गावासह खेड तालुक्यातील रिक्त असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तात्काळ भरावीत अशी मागणी श्री प्रकाश पालकर यांनी केली आहे.









