फटाके आणि गुलालरहित विसर्जन मिरवणुकीने जैतापूरच्या राजाला निरोप..

राजन लाड( जैतापूर) फटाके आणि गुलालरहित विसर्जन मिरवणुकीने जैतापूरच्या राजाला निरोप..
राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे जैतापूर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.

 

 

यावर्षी या उत्सवाचे 25 वे वर्ष म्हणजे रोप्य महोत्सवी वर्ष होते. मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचा प्रथम क्रमांक या मंडळाला प्राप्त झाला होता.
यावर्षी देखील या मंडळाने शासनाच्या या स्पर्धेत सहभाग घेतला असून शासनाला अपेक्षित जवळपास 25 विविध कला क्रीडा आणि सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गड किल्ले संवर्धन स्वच्छता अभियान पारंपारिक देशी खेळांना प्रोत्साहन सौर ऊर्जा जनजागृती, पारंपारिक लोककला जनजागृती, पथनाट्य, सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा, महिला आनंदोत्सव आदीं बरोबरच अनेक धार्मिक उपक्रमाने साजरा केला.

 

धार्मिक सलोखा जोपासत ईद-ए-मिलाद च्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या जुलूस चे स्वागत केले. सेवानिवृत्त आणि वयोवृद्ध ज्येष्ठांचा सन्मान देखील राजाच्या दरबारात पार पडला. विविध सामाजिक धार्मिक उपक्रमाने संपन्न झालेल्या या उत्सवाची सांगता जैतापूर एसटी स्टँड ते जैतापूर बंदर जेटी धक्क्यापर्यंत वाजत गाजत मात्र फटाके आणि गुलाल रहित विसर्जन मिरवणुकीने झाली.

 

 

या उत्सवाला आमदार राजन साळवी, सिंधू रत्न समृद्धी योजनेचे किरण सामंत, अपूर्वा ताई सामंत, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या माजी आमदार हुस्नबानु खलीपे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, मंडळाचे हितचिंतक आणि मार्गदर्शक एडवोकेट शशिकांत सुतार यांसह राजापुरातील सर्व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसह, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेट देत मंडळाला शुभेच्छा दिल्या.
सागरी पोलीस ठाणे नाटेचे प्रभारी अधिकारी अविनाश केदारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मंडळाला मार्गदर्शन करण्याबरोबरच चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता .
उत्सवाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे जैतापूर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.