*
*देवरूख (प्रतिनिधी)* संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पोलीस ठाणे व जय हनुमान मित्रमंडळ यांच्यावतीने हनुमान मंदिरात विराजमान झालेल्या देवरूखचा राजा २१ दिवसांच्या गणरायाचे आज शुक्रवारी मिरवणुकीने वाजत-गाजत भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वा. विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, जय हनुमान मित्रमंडळाचे पदाधिकारी, सदस्य, गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
देवरूखच्या राजा या गणरायाची गणेश चतुर्दशीच्या दिवशी दि. ७ सप्टेंबर रोजी हनुमान मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली होती. २१ दिवसांचा गणराय अशी ओळख असलेला हा देवरूखचा राजा नवसाला पावतो अशी गणेशभक्तांची श्रध्दा आहे. २१ दिवसांच्या कालावधीत या गणरायाचे गणेशभक्तांनी दर्शन घेतले. या कालावधीत देवरूख कांगणेवाडी महिलांचे टिपरी नृत्य, मोर्डे घाटकरवाडी गोफ व टिपरी नृत्य, देवरूख पर्शुरामवाडी गोफ व टिपरी नृत्य, देवधामापूर सप्रेवाडी गोफ व टिपरी नृत्य, तळवडे येथील महिलांचे टिपरी नृत्य, भजने, देवरूखमधील महिलांचे गणपती अथर्वशीर्ष पठण आदि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तब्बल २१ दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज शुक्रवारी या गणरायाला वाजत-गाजत मिरवणुक काढत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाणार आहे. सायंकाळी ५ वा. हनुमान मंदिर येथून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. यानंतर ही मिरवणुक मारूती मंदिर चौकमार्गे स्टेटबँक रोड, बसस्थानक, बाजारपेठमार्गे मच्छीमार्केट अशी काढण्यात येणार आहे. साधारणपणे रात्री १० वा. या गणरायाचे मच्छीमार्केट येथील सप्तलिंगी नदीपात्रात भक्तीभावात विसर्जन करण्यात येणार आहे.












