चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील निवळी गावचे रहिवासी आणि रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघामध्ये सचिव म्हणून २६ वर्षे योगदान दिलेले सेवानिवृत्त ग्रामसेवक दत्ताराम गोविंद महाडीक यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
महाडिक यांनी वयाच्या ८७व्या वर्षी वयोमानपरत्वे या संस्था कामातून सेवानिवृत्ती घेतली. त्यांनी आपल्या कार्यकाळात रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघासाठी मौलिक योगदान दिले. महाडिक यांनी संस्थेसाठी काहीकाळ खजिनदार म्हणूनही काम केले होते. संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव यांच्या हस्ते, सावर्डे येथील हॉटेल पॅसिफिक येथे नुकत्याच झालेल्या जनरल वार्षिक सभेत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सचिव संतोष गुरसळे, विश्वस्त सचिन बाईत उपस्थित होते. महाडिक यांनी यापूर्वी निवळी ग्रुप विविध कार्यकारी सोसायटी लि., अध्यात्म तत्त्वज्ञान प्रचार समिती, निवळी ग्रामपंचायतीच्या जलस्वराज्य योजनेचे लेखा परिक्षण अधिकारी, निवळी ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष, संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही सामाजिक योगदान दिले आहे. दत्ताराम महाडिक यांनी, ग्रामसेवक म्हणून केलेल्या गावविकासाच्या कामांचा दस्तऐवज असलेले, ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’ हे पुस्तक २०१५ साली प्रसिद्ध झाले असून ते साहित्यिक-पत्रकार धीरज वाटेकर यांनी लिहिलेले आहे. एखाद्या गावचा ग्रामसेवक आपल्या मर्यादित क्षेत्रात किती काम करू शकतो, याच्या नोंदी या पुस्तकात आहेत.












