खेड(प्रतिनिधी) खेड शहरातील बच्चे कंपनीसह आबालवृद्धांच्या विरंगुळ्यासाठी असलेल्या प्रबोधनकार ठाकरे उद्यानाला लवकरच नवा साज चढून हे उद्यान रूपडे पालटणार आहे. आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी १२ लाख ५५ हजार २६० रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार योगेश कदम यांच्याहस्ते सुशोभिकरण कामाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडण्यात आला. निधीतून उद्यानात ‘माझं खेड सेल्फी पॉईंट सह विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
प्रबोधनकार ठाकरे उद्यानाच्या सुशोभिकरणाचे घोंगडे वर्षानुवर्षे भिजत पडले होते. उद्यानाच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव लालफितीत अडकून पडल्याने दुरुस्तीअभावी उद्यानाची दैनावस्था
झाली होती. साडेचार वर्षापूर्वी उद्यानाच्या सुभोभिकरणावर लाखो रुपयांचा खर्च करूनही उद्यान भकास झाले होते. उद्यानात केवळ बसण्यासाठी असलेली आसने वगळता अन्य साहित्याचा थांगपत्ताच नव्हता.
ठाकरे उद्यानाला नवा साज देण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख कुंदन सातपुते व पदाधिकाऱ्यांनी उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी निधीची उपलब्धतता करून देण्यासाठी आमदार कदम यांच्याकडे आग्रह धरला होता. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात आमदार कदम यांनी
पाठपुरावा केला.
या निधीतून उद्यानात अद्ययावत व मोठ्या स्वरूपातील ‘माझं खेड सेल्फी पॉईंट’ची उभारणी करण्यात येणार आहे. उद्यानात बागडण्यासाठी येणाऱ्या बच्चेकंपनीसह आबालवृद्धांना ‘सेल्फी’ घेण्याचा मोह आवरता येणार नाही. तसेच खेड- भरणे मार्गालगतच्या उद्यानाबाहेरच्या परिसरात विद्युतीकरण करण्यात येणार आहे. सुशोभिकरण भूमिपूजनप्रसंगी शहरप्रमुख कुंदन सातपुते, उपशहरप्रमुख स्वप्निल सैतवडेकर, महिला आघाडी शहर संघटिका माधवी बुटाला, युवासेना शहर अधिकारी सिद्धी खेडेकर, माजी नगरसेवक सतीश चिकणे, मिनार चिखले, भूषण चिखले, उद्योजक शैलेश कदम, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग माने, ओंकार तोडकरी, कुंतल चिखले, प्रसाद शिगवण, दीपक नलावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.










