तळवली ग्रामदेवता श्री सुकाईदेवीच्या पाषाण मूर्तींचे उद्या आगमन

 

देवघरमधून होणार भव्य रॅलीने जयघोषात स्वागत

गुहागर l प्रतिनिधी :तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या पाषाण मूर्तींचे उद्या सोमवार दिनांक 7 रोजी दुपारी 3 वाजता देवघर पेट्रोल पंप येथून वाजत गाजत भव्य रॅलीने ग्रामदेवतेचा जयघोष करत निघणार आहे.

पंढरपूर येथून तयार करून आणलेल्या पाषाण मूर्ती देवघर पेट्रोल पंप येथे सोमवारी दुपारी 3 वाजता आणल्या जातील त्यानंतर यामध्ये गावातील दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहने देवघर पेट्रोल पंप येथून भव्य रॅलीने ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा जयघोष करत ही रॅली तळवली हायस्कूल येथे सीमेपर्यंत आणण्यात येईल.यानंतर तळवली गावच्या सीमेवरून ढोल-ताशांच्या आणि सनईच्या सुरात ही मिरवणूक गावच्या सहाणेपर्यंत आणण्यात येणार आहे.

तळवली गावची ग्रामदेवता सुकाई देवी ही जागृत असून भक्तांच्या हाकेला धावून धावणारी अशी तिची ख्याती आहे.अनेक वर्षांच्या कालखंडानंतर हा पाषाण मूर्ती जीर्णोद्धार सोहळा पार पडत असल्याने मोठ्या उत्साहाचे वातावरण गावात निर्माण झाले आहे.आपल्या ग्रामदेवतेच्या आगमनासाठी येथील भक्तगण आतुरला आहे. या पाषाण मूर्ती आगमन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सुकाईदेवी ग्रामदेवता कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.