बंदराच्या विकासामुळे मच्छीमारांना ताकद मिळेल
साखरीनाटे बंदराच्या कामाचे भूमिपुजन संपन्न
राजापूर | प्रतिनिधी : रत्नागिरीतील मिरकरवाडा, राजापूरातील साखरी नाटे व दापोलीत हर्णे ही तिन प्रमुख बंदरे जिल्हयाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यामुळे या तिन्ही बंदरामध्ये मच्छीमार बांधवांना अद्ययावत अशा सेवा सुविधा उपलब्ध करून देताना या बंदरांचा विकासात्मक कायापालट करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यासाठी शासनाने भरघोस असा निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील हे साखरीनाटे बंदर देखील भविष्यात एक आदर्श असे अद्ययावत सुविधांनी युक्त असे बंदर असेल अशी ग्वाही राज्याचे उदयोगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी साखरीनाटे वासीयांना दिली.
या बंदराचा विकास करताना जोडरस्ते, मच्छी सुकवण्यासाठी ओटे आणि या भागातील महिलांचा महत्वपुर्ण असा पाणीप्रश्नही सोडविला जाईल अशी ग्वाही ना. सामंत यांनी यावेळी दिली.
तालुक्यातील साखरीनाटे बंदराच्या कामासाठी शासनाकडून शासनाकडून सुमारे १५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या बंदर विकास कार्यक्रमाचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी साखरीनाटे येथे आयोजित कार्यक्रमात ना. सामंत बोलत होते.
या कार्यक्रम प्रसंगी व्यासपिठावर सिंधुरत्न समृद्ध योजना कार्यकारी समितीचे सदस्य किरण सामंत, तहसीलदार विकास गंबरे, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, साखरीनाटे सरपंच गुलजार ठाकूर, नाटे सरपंच संदीप बांदकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, नाटे विभाग प्रमुख मनोज आडविलकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमजद बोरकर, साखरी नाटे सहकारी सोसायटीचे चेअरमन शफी वाडकर, शिवसेनेचे कार्यकर्ते आदिल म्हसकर, मेरीटाईम बोर्डाचे उप प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ, मत्स्य विभागाचे सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव, मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता मनीष मेटकर, मेरीटाईम बोर्डाचे उप अभियंता वेदभूषण करंगुटकर, मेरीटाईम बोर्डाचे सहाय्यक अभियंता विनायक एकावडे आदींसह मच्छीमार सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. सामंत म्हणाले, 153 कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या जेटीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले हे माझे भाग्य आहे. साखरी नाटे मिरकरवाडा बंदर, हर्णे बंदर ही तीन बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी बंदरे आहेत. हर्णे बंदर विकासासाठी 200 कोटी याआधी मंजूर करण्यात आले आहेत. आता साखरीनाटे बंदरासाठी 153 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटी रुपये देण्यात येतील. कर्नाटक राज्यामधील मल्पी बंदरापेक्षाही सर्व सोयी सुविधेने परिपूर्ण असे सुंदर बंदरे जिल्ह्यात होतील. पालकमंत्री म्हणाले, विकास कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. गडकिल्ले संवर्धनासाठी 3 कोटी, रस्त्यांसाठी 4 कोटी, मुख्यमंत्री सडक योजनेतून 50 किलोमीटरचे रस्ते राजापुरात मंजूर केले आहेत. साखरीनाटे बाजारपेठ रस्ता काँक्रिटीकरण, राजापूर तालुक्यातील धरणासही पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जामदा धरण डागडुजीचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मच्छीमारांचा डिझेल कोटा बंद संदर्भात आपण स्वतः सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
महायुती सरकारच्या माध्यमातुन हे काम मंजूर झालेले आहे हे लक्षात घ्या, काम कोण करत हे लक्षात ठेवा, किरण सामंत हे आपल्या भागातील कामांचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे भविष्यात या भागाच्या विकासासाठी त्यांना साथ द्या असे आवाहनही ना. सामंत यांनी केले.
याप्रसंगी ना. सामंत यांसह किरण सामंत व मान्यवरांचा साखरीनाटे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.











