मंडणगड शहरातील आर. के रेस्टो. हॉटेलमधील भयंकर घटना
मंडणगड : प्रतिनिधी – मंडणगड शहरातील आर. के. रेस्टो. हॉटेल मध्ये कढईतील तेलाचा आगीने भडका उडाल्याने सिलेंडरच्या रेग्युलेटर जळून स्पोट होऊन काही प्रमाणात आग लागल्याची घटना बुधवारी ( दि. 23 ऑक्टोबर ) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आसपासच्या दुकानदारांनी तत्काळ मदतकार्य केल्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यास मदत झाली. दरम्यान यादुर्घटनेत हॉटेल मधील एका कर्मचाऱ्यास दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवित अथवा मोठी वित्त हानी झाली नाही.
आर. के. रेस्टो. हॉटेल हे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नेहमीच गजबजलेले असते. बुधवारी सायंकाळी हॉटेल मधील कर्मचारी किचनमध्ये काम करत असताना अचानक कढईतील तेलाने पेट घेतला, आगीच्या भडक्यामुळे सिलेंडरच्या पाईप व रेग्युलेटरने पेट घेतला. रेग्युलेटर उडाल्याने स्पोट झाल्याचा आवाज सर्वत्र झाल्याने आसपासच्या दुकानदारांनी तत्काळ आग विझवण्यासाठी मदतकार्य सुरु केले. या घटनेचा उशिरापर्यंत पंचनामा झाला नव्हता. मात्र रहदारीच्या व गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत थोडक्यात नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने सर्वानीच सुटकेचा नीश्वास सोडला. या दुर्घटनेत करण्यास रुपेश साळुंखे, राहुल खांबे, साईराज सावंत, कौस्तुभ भिंगार्डे व आसपासच्या दुकानदार व्यापाऱ्यांनी मदकार्य करण्यास पुढाकार घेतला. यावेळी एच. पी. गँस एजन्सीचे कर्मचारी, महावितरण चे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी भेट देवून मदत्कर्याची कार्यवाही सुरू केली.

दुर्घटनेनंतर अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर – दुर्घटनाग्रस्त आर.के. रेस्टो. हॉटेल हे रहदारीच्या टिकाणी व नगरपंचायत कार्यालयाच्या अगदी नजीक आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी शहरातील मुख्य चौकातील दुकानाला आग लागून या हे दुकान पूर्णपणे खाक झाले होते. शहरात नगरपंचायत कार्यरत असून अग्निशमन यंत्रणा नसल्याने नगरपंचायतीच्या कारभाराबाबत सर्वानीच यावेळी प्रश्न उपस्थित केला.











