(माझे कोकण)
कोकणात गेले दोन दिवस पाऊस थांबला आहे. दिवाळीच्या कालावधीत एक-दोन वेळा परतीचा पाऊस पडायचा हा पुर्वानुभव अलिकडे खोटा ठरत आहे. अगदी यावर्षी तर कोकणातील भातशेतीचे होणारे नुकसान पहावं लागत आहे. कोकणातील शेतकरी हतबल आहे.
महिन्याभरापूर्वी यावर्षी शेती उत्तम आहे. कदाचित बंपर तांदुळ घरात येईल असं सांगणारा शेतकरी, जे नुकसान झाले आहे ते नुकसान सोसण्यापलिकडे आपण काही करू शकत नाही. यामुळेच पावसाच्या शेतीत साचलेल्या पाण्यातून काही वाचवता येईल का, हा प्रयत्न शेतकरी करीत राहिला.
शेतकऱ्यांनी हातात आलेले पिक आपलं म्हणत ते घेतलं. दिवाळीत पाऊस पडतच नाही असे नाही, परंतु यावेळी फारच पावसाने कहर केला आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ पाऊस कोसळत होता. यामुळे भातकापणी आणि भाताची झोडणी अशा सर्वच बाबतीत शेतकऱ्यांना अक्षरश: कसरत करावी लागली.
पावसाळी वातावरण राहिल्याने नोव्हेंबर महिन्यात सुरू होणारी थंडी अद्याप पर्यंत सुरू झालेलीच नाही. दिवाळीचा अभ्यंगस्नानाचा पहिला दिवस हा कडाक्याच्या थंडीचा असायचा. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी पडणारी प्रचंड थंडी आणि त्यात पहाटे कारीट फोडण्याचा आनंद काही औरच होता.
कडवट कारटाच्या बिया तोंडात टाकून, त्याच्या कडवटपणाला सामोरे जाण्याचा आणि गरम कांदा-पोहे, चकली, करंजी अशा फराळाचा आनंद लुटण्याचा क्षण, तो आनंदही काही वेगळाच होता. आज फराळ तयार मिळतो, पण घरच्यांच्या हातचा फराळ अजूनही त्या चवीला पर्याय नाही.
गावातल्या दिवाळीत नेहमीच शहरांपेक्षा साधेपणा होता. फटाक्यांची आतषबाजी किंवा विद्युत रोषणाई नसली तरी पहाटेच्या अभ्यंगस्नानानंतर पहिलं कारीट फोडण्यात स्पर्धा असायची. पहिल्या आरोळीच्या आणि पहिल्या उठणाऱ्याच्या स्पर्धा, हा त्यावेळचा उत्साह आजच्या युगात फारसा राहिलेला नाही.
यावर्षी दिवाळी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या वातावरणातच होत आहे. निवडणुक प्रचार करणाऱ्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनाही अतिशय उत्साही वातावरणात प्रचार करताना दिसतो. कोकणात तिरंगी, चौरंगी लढतींमुळे निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.
कोणत्याही निवडणुका विकासाच्या मुद्यावर लढवल्या गेल्या पाहिजेत, हे खरी अपेक्षा आहे. आपल्या सत्ताकाळात काय कामे केली आणि समाजहिताचे निर्णय घेतले, यावर चर्चा व्हायला हवी. पण प्रत्यक्षात मात्र व्यक्तिगत टीका करीत लढवलेली लढत दिसते.
कोकणात ‘राणे’ कायम टिकांच्या केंद्रस्थानी असतात. विरोधक कितीही टीका करोत, निवडणुकीत मात्र राणेच विजयी होतात, हे एक सत्य आहे. त्यामुळे कोकणात निवडणुका म्हटल्या की विकासावरची चर्चा होत नाही, हेच दिसते.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण, शेतात व्यस्त शेतकरी आणि निवडणुकीचे वातावरण हे सध्या एकत्र दिसत आहे. कोकणवासीय शेतीची कामे, दिवाळीचा फराळ आणि निवडणुकीचे फटाके याचा एकत्रित आनंद घेत आहेत.











