विद्यमान आ. योगेश कदम यांनी 3500 कोटीच्या विकासाच्या मुद्द्यावर लढवली निवडणूक
रुपेश वाईकर (दापोली प्रतिनिधी:) विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी बाबत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदान संघातील जनतेला ही कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. मतदानाचा वाढलेला टक्का आणि अत्यंत चुरशील अशा झालेल्या मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे संजय कदम बाजी मारणार ते महायुतीचे विद्यमान आ. योगेश कदम बाजी मारणार काही तासातच स्पष्ट होणार आहे.
या मतदारसंघातून या निवडणुकीत महायुतीचे विद्यमान आमदार योगेश कदम, महाविकास आघाडीचे संजय कदम तर मनसेचे संतोष सोनू अबगुल, बसपाचे प्रवीण मर्चेंडे तर अपक्ष उमेदवार ज्ञानदेव खांबे, संजय संभाजी कदम, , संजय सीताराम कदम, योगेश रामदास कदम व योगेश विठ्ठल कदम (अपक्ष) उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
मात्र खरी लढत महायुतीचे आमदार योगेश कदम विरुद्ध
महाविकास आघाडीचे संजय कदम यांच्यात होणार असून यात कोण बाजी मारणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्यातच गतवेळच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने तो कोणाला त्रासदायक व कोणाला लाभदायक ठरणार याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे.
या निवडणुकीत महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाविकास आघाडी कडुन आदित्य ठाकरे तर मनसे कडून गुहागर मध्ये राज ठाकरे यांच्या जाहीर सभा झाल्या होत्या. सर्वच उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटी आणि गावभेटीवर प्रचार करण्यात विशेष लक्ष केंद्रित केले होते. काहिंनी विकासाच्या मुद्द्याला हात घालत तर काहींनी भावनिक मुद्या उपस्थित करत निवडणूक लढली आहे. यामुळे मतदार राजाने आपल्या मतांचे दान कोणाच्या पारड्यात टाकले आहे याबाबत उत्सुकता आहे.
महायुतीचे उमेदवार आ. योगेश कदम यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या 3500 हजार कोटीच्या विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडत पुन्हा एकदा संधी देण्याची विनंती मतदारांना केली आहे. तर महाविकास आघाडीचे संजय कदम यांनी भावनिक मुद्दा उपस्थित करत लोकांना साद घातली आहे. यामधील मनसेचे उमेदवार हे बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाचे प्रतिनिधी म्हणून संधी देण्याचे विनंती केली. त्यामुळे कुणबी फॅक्टर किती यशस्वी ठरतो यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. या निवडणुकीतील मतदानानंतर महायुतीचे उमेदवार योगेश कदम महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी आपल्या विजयाचा दावा सांगितला आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार त्याबाबत उत्सुकता लागुन राहिलेली आहे.










