नगरपालिका प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांची नाराजी
लांजा (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानंतरही पत्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांच्या पत्र न देण्याच्या भूमिकेबाबत कोत्रेवाडी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कोत्रेवाडी येथे होणाऱ्या डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत कोत्रेरेवाडी ग्रामस्थांची एक बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पार पडली होती.
यावेळी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी आपण बहिष्कार का टाकला आहे? याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना लांजा नगरपंचायतीने कोत्रेवाडी येथे जोर जबरदस्तीने डम्पिंग ग्राउंड करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे हा डंपिंग ग्राउंड प्रकल्प लोकवस्तीपासून अगदी जवळ असून या ठिकाणी जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही. पाण्याचे जलस्त्रोत आहेत. आणि त्यामुळे भविष्यात ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. संपूर्ण वाडी बाधित होऊन वाडी उध्वस्त होऊ शकते अशा शब्दात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपली व्यथा मांडली होती. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकल्प घातक होऊ शकतो ही बाब निदर्शनास आणून दिली होती.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी लोकांचा विरोध असल्याने हे संपूर्ण प्रकरण नियमानुसार पुन्हा तपासून घेण्याचे निर्देश लांजा न.पं. च्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांना दिले होते. तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार या संपूर्ण प्रकरणाबाबत नियमानुसार चौकशी करण्याचे निर्देश व तसे लेखी पत्र उद्या १९ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांना द्यावे असे आदेश त्यांनी नगरपालिका प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांना दिले होते.
. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही नगरपालिका प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांच्याकडून सदर पत्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच याबाबत आपण वारंवार त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे दिली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही अशा प्रकारे प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांच्याकडून ग्रामस्थांना पत्र देण्यास टाळाटाळ केली जात असेल तर या मागचे नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्न कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.










