खेड (प्रतिनिधी) खेड नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचारी सीमा संतोष जाधव या शहरातील एल. पी. इंग्लिश स्कूल परिसरात स्वच्छतेचे काम करत असताना एका बाकड्यावर पैशांचे पाकिट आढळले. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मदतीने ते पाकिट मालक असलेले सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडे सुपूर्द करीत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
त्यांच्या या प्रामाणिक कृतीचे श्री. खेडेकर यांच्यासह तालुक्यातून कौतुक होत आहे. सीमा जाधव या साफसफाईचे काम करींत असताना ते पाकिट सापडले. त्यांनी तातडीने मनसेचे नेते, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील राज वैभव पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिले. पाकिटात साडेपाच हजार रूपये आणि अन्य कागदपत्रे होती. यामध्ये आधारकार्ड व।शिवशाही बसचे आरक्षित तिकीट सापडले. त्यावरून वैभव खेडेकर यांनी एस.टी. आगारात चौकशी करत
त्यांचा संपर्क क्रमांक मिळवून संपर्क साधला. त्या नंतर हे पाकिट सखाराम गोविंद भोसले यांना राजवैभव पतसंस्थेत ताब्यात देण्यात आले. या प्रामाणिकपणाबद्दल श्री. भोसले यांनी सीमा जाधवं यांचे आभार मानले.









