गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी केले अभियानाबाबत मार्गदर्शन
वेंगुर्ला : प्रतिनिधी : ग्रामपंचायत स्तरावरील विविध अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दोन दिवशीय अनिवासी प्रशिक्षण पाणी पुरवठा योजनेशी निगडीत जल साक्षरता प्रशिक्षण वेंगुर्ले येथे संपन्न झाले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी जलसाक्षरता अभियानाचे महत्त्व, जलसाक्षरता अभियानातील मुख्य घटक, जलसाक्षरता अभियानाची व्याप्ती यबाबत मार्गदर्शन केले.
वेंगुर्ले येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय महाराष्ट्र शासन, पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद सिधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या सहकार्याने जे.पी.एस.फाऊंडेशन लखनौ या मुख्य संसाधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता प्रफुल्लकुमार शिदे यांनी सर्वांनी वैयक्तिक नळ जोडणी पूर्ण करून लोकांना शुद्ध, स्वच्छ व पुरेसे पाणी पुरवठा करण्याबाबतचे आवाहन केले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या अंमलबजावणी सहाय्य संस्थेच्या प्रशिक्षण समन्वयक प्रज्ञा सावंत, वेंगुर्ला पंचायत समिती गट साधन केंद्राच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या द्रोपदी नाईक, जे.पी.एस.फाऊंडेशन लखनौ या मुख्य संसाधन केंद्राचे तज्ज्ञ प्रशिक्षक भिवा आयनोडकर, जयराम जाधव, श्रद्धा खाडे, सोनाली चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रद्धा खाडे व द्रोपदी नाईक यांनी परिश्रम घेतले.











