ठाणे: ग्रामपंचायतींना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार काय? मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविला निष्कर्ष

डोंबिवली : ग्रामपंचायतींना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार आहेत का ? असा सवाल करत उच्च न्यायालयाने गोळवली ग्रामपंचायतीने दिलेल्या बांधकाम परवानगीचा आधार घेऊन उभारण्यात आलेल्या शुभारंभ हाॅलचे बांधकाम बेकायदा असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या डोंबिवली जवळच्या गोळवली गाव हद्दीतील शुभारंभ बॅन्क्वेट हाॅलचे बांधकाम  मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या आदेशांनुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आय प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या कारवाईत भुईसपाट केले.

 

 

सुट्टीचा दिवस असुनही कारवाई

हे बांधकाम बेकायदा असल्याने ते स्वत:हून तोडून घेता की आम्ही आदेश देऊ, असा सवाल न्यायालयाने केडीएमसीच्या वकिलाला केला. केडीएमसीचे वकील ॲड. संदीप शिंदे यांनी दोन दिवसांत हे बेकायदा बांधकाम पाडण्यात येईल, असे आश्वासन न्यायालयाला दिले. त्यानुसार केडीएमसीच्या आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी शनिवारी सुट्टीचा दिवस असुनही आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड आणि उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून शुभारंभ हाॅलवर कारवाई सुरू केली.

गोळवली गावाच्या हद्दीत मदन गुप्ता यांच्या मालकीचा तीन माळ्याचा वाणीज्य वापराचा शुभारंभ बॅन्क्वेट हाॅल होता. हे बांधकाम बेकायदा असल्याच्या तक्रारी माहिती कार्यकर्त्या प्रीती कुथे यांनी केडीएमसी आयुक्त ते आय प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे मागील दोन-तीन वर्षात केल्या होत्या. यापूर्वी दोनदा या बांधकामावर कारवाई झाली होती. सततचा पाठपुरावा करूनही केडीएमसीकडून कारवाई होत नसल्याने माहिती कार्यकर्त्या कुथे यांनी ॲड. निखील वाजे आणि ॲड. वीरेन तपकीर यांच्या साह्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हे बेकायदा बांधकाम तोडण्याची मागणी केली होती.

न्यायालयाने सर्व बाजू ऐकून हे बांधकाम बेकायदा असल्याचा निष्कर्ष काढला. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी न्यायालयाने हे बांधकाम तोडण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यावेळी हाॅल मालकाकडून काही आक्षेप घेण्यात आले होते. न्यायालयाने तोडकामाला अंतरिम स्थगिती दिली होती. शुभारंभ हाॅलचे प्रकरण गेल्या आठवड्यात पुन्हा सुनावणीला आले. न्यायालयाने शुभारंभ हाॅलचा सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेला इमारत बांधकाम आराखडा सादर करण्याचे आदेश हाॅल मालकाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना दिले. गोळवली ग्रामपंचायतीने बांधकामाला मंजुरी दिल्याच्या ठरावाची प्रत न्यायालयाला दाखविण्यात आली. न्यायालयाने ही परवानगी बोगस असल्याचा निष्कर्ष नोंदविला. त्यानंतर केडीएमसीचे वकील ॲड. संदीप शिंदे यांनी येत्या पुढील दोन दिवसांत हे बांधकाम तोडण्यात येईल,असे आश्वासन न्यायालयाला दिले.

अखेर शुभारंभ हाॅल भुईसपाट

सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी जेसीबीसह तोडकाम पथकाच्या साह्याने बेकायदा हाॅल तोडण्याची कारवाई शनिवारी सुरू केली. अखेर सोमवारी शक्तिमान कापकाम यंत्राच्या साह्याने शुभारंभ हाॅल भुईसपाट करण्यात आला. गोळवली ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी घेऊन शुभारंभ हाॅलची उभारणी करण्यात आली होती. हाॅल मालक मदन गुप्ता या बनावट कागदपत्रांवर विसंबून होते. न्यायालयाने या बेकायदेशीर कृत्यावर टीका केली. न्यायालयाने हे बांधकाम बेकायदा असल्याचा निष्कर्ष नोंदविला. त्यामुळे हाॅलवर कारवाई झाल्याचे याचिकाकर्ता प्रीती कुथे यांचड वकील ॲड. निखील यांनी सांगितले.

 

 

उच्च न्यायालयाने शुभारंभ हाॅल बेकायदा असल्याचा निष्कर्ष काढला. न्यायालयाच्या आदेशांनुसार आयुक्त आणि उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हे बेकायदा बांधकाम भुईसपाट करण्यात आल्याचे आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितले.