खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील विन्हेरे फाटा येथील अपघातात पाच जखमी झाल्याची तक्रार तब्बल ११ महिन्यानंतर येथील पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. हा अपघात . ३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ :३० च्या सुमारास झाला होता.
मात्र या अपघातात जखमी झालेले पाचही जण आजपर्यंत सावरू शकले नसल्याने ते दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ७ : १३ वाजता खेड पोलीस स्थानकात उपचाराचे कागदपत्र घेऊन समक्ष हजर राहिले आणि टेम्पो ट्रॅव्हल्सच्या चालकाच्या विरोधात कायदेशीर फिर्याद जखमीपैकी नितीन त्रिभुवनदास रामचुरा (वय-५७) यांनी दिली आहे. त्यानुसार येथील पोलीसांनी भा.दं. वि. सं. कलम २७९, ३३७, ३३८ व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे शैलेश संपत बिरामणे (रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातान नितीन त्रिभुवनदास रायचुरा (५७, साईनगर, अमरावती), सौ. संगिता नितीन रायचुरा, सौ. संगीता ओमप्रकाश गोंडाणे, सौ. चेतना जितेंद्र ठाकूर व सतीश विठ्ठलराव सकसुळे अशी जखमी झालेल्या पाचजणांची नावे आहेत.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार .. ३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ :३० वाजताच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक (एम. एच.४३, बी.पी. ६९०१ ) चे चालक शैलेश संपत बिरामणे याने गोवा ते मुंबई हायवेवरील तालुक्यातील विन्हेरे फाटा येथे त्याच्या ताब्यातील वाहनाचा ताबा सुटून समोरील ड्रायव्हर बाजूचे चाक डिवायडरला घासून टायर फुटून वाहन पलीकडील रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला जाऊन धडकली . या अपघातात फिर्यादी नितीन रायचुरा यांच्या उजव्या हाताला व पायाला फ्रॅक्चर झाले आहे तसेच त्यांची पत्नी सौ संगिता यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले . त्याचप्रमाणे सौ. संगिता गोंडाणे यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले . तसेच सौ. चेतना ठाकूर यांचे कमरेतून दोन्ही पाय निकामी झाले आहेत. हे पाचही जखमी अपघातातून आजपर्यंत सावरलेले नसल्याने उपचाराचे कागदपत्र घेऊन समक्ष राहून तब्बल ११ महिन्यानंतर तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.












