रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खेड येथील ज्ञानदीप विज्ञान आणि वाणिज्य कॉलेज येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या १९ व्या आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभाग घेतला.
या स्पर्धेत विज्ञान शाखेच्या स्वराली इंदुलकर, समृद्धी बोरकर व सिद्धी सुर्वे या (प्रथम वर्ष) विद्यार्थिनींनी रत्नागिरी मध्ये सापडणाऱ्या शिंपल्या आणि चिंगूळ यातील पोषक तत्वे आणि विषारीपणा यांचा अभ्यास हा प्रकल्प सादर केला. कला शाखेतील सानिका भाटकर व अनुष्का भिवंडे या (द्वितीय वर्ष) विद्यार्थिनींनी शारीरिक आरोग्याची समस्या आणि ग्रामीण महिलांच्या आहाराच्या सहसंबंधाचे चिकित्सक अध्ययन- रत्नागिरी तालुक्याचे संदर्भात हा प्रकल्प सादर केला. स्पर्धेत सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी विज्ञान विभागातील सानिका कीर यांनी तर कला शाखेतील प्राजक्ता राड्ये यांनी विशेष मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या आविष्कार रिसर्च समितीच्या प्रमुख आसावरी मयेकर व आरती पाध्ये उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी आणि भारत शिक्षण मंडळातर्फे सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.












