तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या गाव विकासाचा आराखडा तयार करा- आ. किरण सामंत
पांगरे धरण नळपाणीपुरवठा योजनेचे काम ३१ मार्च पर्यंत पुर्ण करा
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील पांगरे चिचवाडी धरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या १३ गावांसाठीची नळपाणी योजना ३१ मार्च पुर्वी कार्यान्वित होईल अशी ग्वाही देताना आमदार किरण सामंत यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकांनी गावच्या सर्वागिण विकासासाठी ग्रामस्थांशी संवाद साधत गाव विकासाचा आरखडा तयार करावा असे आवाहन केले आहे.
राजापूर पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात पाणी टंचाई आराखडा आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी पांगरे चिंचवाडी धरणावरून राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत पादेशिक नळपाणी योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी या योजनेचे काम सद्या सुरळीत चालू असून ५७ टक्के काम पुर्ण झाले असल्याची माहीती दिली.
यावेळी कोंढेतडचे माजी उपसरपंच अरवींद लांजेकर यांसह कोंड्ये तर्फे राजापूर ग्रामपंचायतीने टाकीसाठी बक्षीस पत्र करून दिले असून ठेकेदारामुळे काम रखडले असल्याचे नमुद केले. ससाळे सरपंच सौ.शोभा तांबे यांनी शासकीय जागामध्ये उभारण्यात येणाऱ्या टाकीसाठी प्रशासकीय मंजूरी अडथळा ठरत असून लवकरात लवकर ही समस्या दूर करावी अशी मागणी केली. यावेळी आमदार सामंत यांनी १३ गावातील अडचणी जाणून घेत असलेल्या समस्यांवर तोडगा काढून ही नळपाणी योजना ३१ मार्चपुर्वी कार्यान्वित होईल अशी ग्वाही दिली. ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना सोबत घेऊन आपला विकास आराखडा तयार करून हा आराखडा त्वरीत पंचायत समिती कार्यालयांत सादर करावा, त्या आराखड्याला अनुसरून गाव निहाय कामांना निधीची तरतुद होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आ. सामंत यांनी स्पष्ट केले आहे. या बैठकीत त्यांनी प्रत्येक ग्राम पंचायतीने आपापल्या गावांत गरज असलेल्या योजना, रस्ते, पाणी, आरोग्य तसेच पायाभूत सुविधा यांचा प्राधान्यक्रम ठरवून तसा आराखडा तयार करावा, मात्र यावेळी ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे असे सांगितले. यावेळी पांगरे सरपंच वैष्णवी कुळये, भरत लाड, अरविंद लांजेकर, प्रकाश कुवळेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. तर तालुक्यातील ग्रामसेवक व सरंपच उपस्थित होते.










