रेल्वे सुरक्षा पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीला ३ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा 

 

 

मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये सहा वर्षांपूर्वी घडली होती घटना 

 

 

रत्नागिरी : प्रतिनिधी

जनरल डब्याचे तिकिट असताना राखीव स्लीपर कोचमध्ये बसल्यामुळे हटकल्याने रेल्वे सुरक्षा पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने बुधवारी 3 वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. ही घटना 26 एप्रिल 2018 रोजी मेंगलोर येथून मुंबईकडे जाणार्‍या मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये घडली होती.

सर्जिल पिलपिले (रा.मिरजोळे, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 26 एप्रिल 2018 रोजी तो आणि त्याचा भाउ आसिफ पिलपिले हे दोघे मेंगलोरहून मुंबईकडे जाणार्‍या मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये चढले. त्यांच्याकडे जनरल डब्याचे तिकिट असताना ते राखीव स्लीपर कोचमध्ये बसले होते. त्यावेळी तिकिट तपासनीसांनी त्यांना दंड भरण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला. म्हणून रेल्वे चिपळूण रेल्वेस्टेशनला आल्यावर तिकिट तपासनीसाने त्यांना जनरल डब्यात जाण्यास सांगितले. परंतू त्याने जनरल डब्यात न जाता स्लिपर कोचमधील प्रवाशांशी जागेवरुन वाद घातला.

तेव्हा रेल्वे सुरक्षा बलातील पोलिसांना बोलावण्यात आले असता सर्जील पिलपिले आणि त्याचा भाउ या दोघांनी पोलिसांच्या अंगावर धावून त्यांना मारहाण केली. एका रेल्वे कर्मचार्‍याच्या हातातील टॉर्च खेचून ती त्याच्या कपाळावर मारली. तसेच त्यांना शिवीगाळ करुन रत्नागिरीत आलात तर बघून घेतो अशी धमकी दिली होती. याबाबत रेल्वे कर्मचारी शेळके यांनी प्रथम पनवेल रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली. व त्यानंतर चिपळूण पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दिली होती. चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपासाअंती पोलिस उपनिरीक्षक एस.एम.शेळके यांनी न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यानच्या काळात आसिफ पिलपिले फरार असून विदेशात पळून गेला.

हा खटला अति.सत्र न्यायालय,चिपळूण येथे सूरु होता. सरकारी पक्षातर्फे पुष्पराज शेट्ये यांनी एकूण 8 साक्षिदार तपासले. पुराव्याअंती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. अनिता एस.नेवसे यांनी आरोपीला भादंवि कलम 353,332,504,506 अन्वये दोषी ठरवून 3 वर्षे सक्तमजुरी व 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.