चक्रीवादळे किनाऱ्यावर धडकत आहेत मात्र सायक्लॉन सेंटर उभारण्याला मुहूर्तच मिळेना 

 

 

 

रत्नागिरी :

फियानच्या तडाख्यानंतर किनारी भागातील मानवी वस्तीला संरक्षण मिळावे यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर तीन ठिकाणी सायक्लॉन सेंटर उभारण्याचा निर्णय झाला. त्याला ७ वर्षे झाली असून, त्याचे अंदाजपत्रक ३ वरून १५ कोटीवर पोचले आहे. तरीही त्याला मंजुरी मिळालेली नाही. हा प्रस्ताव लालफितीत पडून आहे.

 

 

फियान चक्रीवादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टीवर थैमान घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली. भविष्यात चक्रीवादळं आली तरीही किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित आसरा मिळावा यासाठी सायक्लॉन सेंटरला शासनाने मंजुरी दिली. २०१८ मध्ये दाभोळ, हर्णै, सैतवडे येथे ३ कोटीचे सायक्लॉन सेंटर मंजूर झाले. पत्तन विभागामार्फत या केंद्राच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या. निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. जी प्लस थ्री असे या सायक्लॉन सेंटरचे स्ट्रक्चर होते. चक्रीवादळातही किनारी भागातील नागरिक या सेंटरमुळे सुरक्षित राहतील, असा हा प्रस्ताव आहे; परंतु ७ वर्षे झाली तरीही केंद्राचे काम सुरू झालेले आहे.

या कालावधीत तौक्ते, निसर्गवादळ आणि महान ही तीन चक्रीवादळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकून गेली. शासनाने पत्तन विभागाला सुधारित अंदाजपत्रक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ते अंदाजपत्रक आता १५ कोटीवर गेले आहे. नवीन अंदाजपत्रक शासनाला पाठवून दोन वर्षे होत झाली तरीही या प्रस्तावांना मंजूरी मिळालेली नाही. पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. शासनाच्या उदासीनतेमुळे लालफितीत ही अंदाजपत्रं अडकून पडली आहेत. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांची सुरक्षा आजही वाऱ्यावर आहे.

 

जिल्ह्यात मंजूर असलेल्या तीन सायक्लॉन सेंटरचे सुधारित अंदाजपत्रक पाठवल्यानंतर तत्काळ हे प्रस्ताव मंजूर होतील, अशी अपेक्षा होती. पत्तन विभाग त्याचा वारंवार पाठपुरावा करत आहे; परंतु दोन वर्षे व्हायला आले तरीही या महत्वाच्या तिन्ही प्रस्तावांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.