रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था
राजापूर l प्रतिनिधी :राजापूर रेल्वे स्थानकाप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा अधिक पटीने प्रवाशांकडून विलवडे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची ये जा करण्यासाठी गर्दी होत असते. त्यामुळे राजापूर रेल्वे स्थानकाप्रमाणेच विलवडे रेल्वे स्थानकाचेही सुशोभिकरण करावे अशी मागणी प्रवाशांतुन होत आहे.
तर मुख्य रस्त्याकडून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची पुरती दुरावस्था झाली असून या रस्त्याचे कामही करावे अशीही मागणी होत आहे.
राजापूर तालुक्यात राजापूर, सौंदळ हॉल्ट स्टेशन व विलवडे अशी तीन रेल्वे स्थानके आहेत. यात सौंदळ हॉल्ट स्टेनशवर केवळ दिवा पॅसेंजर गाडी थांबते, मात्र राजापूर व विलवडे रेल्वे स्थानकांवर दिवा पॅसेंजरसह तुतारी, कोकण कन्या या गाडया देखील थांबतात. त्यामुळे या दोन्ही स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते.
जिल्हयात कोकण रेल्वे मार्गावरील काही स्थानकांचे नुकतेच सुशोभिकरणाचे काम करण्यात आले. त्यामुळे या स्थानकांचे रूपडे पालटले आहे. याचे प्रवाशांतुनही स्वागत होत आहे. यामध्ये राजापूर रेल्वे स्थानकाचे देखील सुशोभिकरण करण्यात आले आहे. राजापूर रेल्वे स्थानकावर या परिसरात येणाऱ्या गावांतील प्रवाशांची मोठी गर्दी असते. तर विलवडे रेल्वे स्थानकावर पाचल पुर्व भागासह राजापूर शहर व लांजा तालुक्यातील काही गावांतील प्रवाशांचीही गर्दी असते.
आता विलवडे रेल्वे स्थानकाचेही सुशोभिकरण करावे अशी मागणी प्रवाशांतुन पुढे आली आहे. या स्थानकावरही प्रवाशांची होणारी गर्दी आणि प्रतिसाद याचा विचार करून प्रशासनाने या स्थानकाचेही आधुनिकीकरण करावे अशी मागणी होत आहे.
वाटूळ ते दाभोळ या मुख्य रस्त्याकडून या स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची पुरती दुरावस्था झाली आहे. त्याचाही मनस्पाप वाहन चालक व प्रवाशांना होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे देखील डांबरीकरण करावे अशीही मागणी होत आहे.











